इस्रायली लष्कराने जवानांना अदृश्य करणारे कॅमाफ्लॉज तयार केले

तेल अविव – आपल्या अतिप्रगत आणि अचंबित करणार्‍या लष्करी तंत्रज्ञनाने जगभरातील लष्करी विश्लेषकांचे लक्ष वेधणार्‍या इस्रायलने आणखी एक गोष्ट जगासमोर आणली. युद्धक्षेत्रात इस्रायली लष्कराच्या जवानांना अक्षरश: अदृश्य करणारे कॅमाफ्लॉज अर्थात छलावरण इस्रायली लष्कराने विकसित केले आहे. यामुळे लष्कराच्या दुर्बिणीबरोबरच थर्मल डिटेक्टर्सद्वारेही जवानांना शोधणे अवघड बनते असा दावा इस्रायली लष्कराने केला. गेल्या दीड महिन्यात इस्रायलने गाझातील संघर्षात ‘एआय’चा वापर, विमानातून लेझरचा मारा आणि विनाशिकाभेदी सी ब्रेकर क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. याद्वारे इस्रायलने आपल्या अतिप्रगत लष्करी सामर्थ्याची झलक दाखविल्याचा दावा केला जातो.

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या ‘पोलारीस सोल्युशन्स’ या खासगी कंपनीने ‘किट 300’ तयार केले आहे. मायक्रोफायबर्स, मेटल आणि पॉलिमर्स यांच्या संयोगाने ‘थर्मल विज्युअल कन्सिल्मेंट’ (टीवीसी) तयार केल्याची माहिती या कंपनीने दिली. या विशेष प्रकारच्या कापडामुळे लष्कराच्या दुर्बिणीतून किंवा अगदी थर्मल डिटेक्टर्समधूनही जवानांचा शोध घेणे शत्रूला अवघड जाऊ शकते, असा दावा इस्रायली कंपनीने केला.

सदर कॅमाफ्लॉज अर्ध्या किलोपेक्षाही कमी वजनाचे आहे. पण या कॅमाफ्लॉजमध्ये सव्वादोनशे किलोहून अधिक वजन उचलण्याची क्षमता असल्याचे इस्रायली कंपनीने सांगितले. युद्धक्षेत्रात जखमी झालेल्या जवानाला बाहेर काढण्यासाठी स्ट्रेचर म्हणूनही याचा वापर होऊ शकतो, असा दावा या कंपनीने केला.

सदर कॅमाफ्लॉज तयार करणार्‍या इस्रायली कंपनीचे संचालक योनाटन पिन्कास हे स्वत: 2016 सालच्या लेबेनॉनमधील युद्धात सहभागी झाले होते. इस्रायली लष्कराच्या स्पेशल युनिटमध्ये असताना पिन्कास यांनी इस्रायली जवानांवर झालेला गोळीबार जवळून पाहिला होता. या युद्धात इराणसंलग्न हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडे नाईट व्हिजन उपकरणे आणि थर्मल कॅमेरा होते. यामुळे हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना इस्रायली जवानांच्या हालचाली टिपणे सोपे झाले होते.

पिन्कास यांनी हे सारे अगदी जवळून अनुभवले होते. म्हणून शत्रूकडील लष्करी दुर्बिण, नाईट व्हिजन उपकरणे आणि थर्मल डिटेक्टर्सना गुंगारा देणारे कॅमाफ्लॉज तयार करण्याची योजना आपण आखल्याचे पिन्कास यांनी स्पष्ट केले. एका बाजूने दगडाचे आवरण तर दुसर्‍या बाजूने झाडाझुडपाचे आवरण असलेले कॅमोफ्लेज कुठल्याही पृष्ठभागावर वापरता येऊ शकते. यामुळे इस्रायली जवान शत्रूदेशात जाऊन मोहीम यशस्वी करून दाखवू शकतात, असा दावा पिन्कास यांनी केला.

इस्रायली लष्कराच्या वेगवेगळ्या युनिट्सनी याची चाचणी घेतल्याचे पिन्कास म्हणाले. इस्रायली लष्कर किंवा संरक्षण मंत्रालयाने या कॅमाफ्लॉजला परवानगी दिली का, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

leave a reply