तालिबानच्या उन्मादी गोळीबारात 17 जणांचा बळी

- मृतांमध्ये मुलांचाही समावेश

गोळीबारातकाबुल – पंजशीरच्या संघर्षात विजय मिळाल्याचे दावे ठोकून तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा बळी गेला. यात 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलांचाही समावेश असल्याने तालिबानवर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर पंजशीरच्या आघाडीवर तालिबानला अजूनही यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने या गोळीबारावर संताप व्यक्त केला.

तालिबानने काबुलचा ताबा घेऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण अजूनही संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविणे तालिबानला जमलेले नाही. राजधानी काबुलपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजशीर प्रांत तालिबानपासून मुक्त असून येथील अहमद मसूद यांच्या सरकारने तालिबानचे नेतृत्व धुडकावले आहे.

गोळीबारातअफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद यांनी पंजशीरमध्ये तालिबानविरोधात नॉर्दन अलायन्सची आघाडी उघडली. त्यांच्या या तालिबानविरोधी आघाडीमध्ये अफगाणिस्तानचे जवान व टोळ्या सामील होत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे तालिबान व तालिबानसमर्थक पाकिस्तानची बेचैनी वाढली आहे.

सालेह आणि मसूद यांनी तालिबानसमोर नमते घेतले, वाटाघाटींसाठी तयार झाल्याच्या बातम्या तालिबान व पाकिस्तानने सोडल्या होत्या. पण नॉर्दन अलायन्सच्या हल्ल्यांमध्ये तालिबानचे दहशतवादी ठार झाल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर तालिबान व पाकिस्तानची फजिती झाली. यानंतर भारत आणि ताजिकिस्तान नॉर्दन अलायन्सला शस्त्र पुरवित असल्याचे आरोप पाकिस्तानी माध्यमांनी सुरू केले.

त्याचबरोबर तालिबान आणि पाकिस्तानी माध्यमांनी पंजशीरची कोंडी फोडण्यासाठी प्रचार सुरू केला होता. तालिबानच्या हल्ल्यांना घाबरुन सालेह व मसूद यांनी ताजिकिस्तानमध्ये पळ काढला, तालिबानने पंजशीर ताब्यात घेतले, आता पूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली आल्याच्या बातम्या पाकिस्तानी यंत्रणांनी माध्यमांनी पेरल्या होत्या.

गोळीबारातमाजी उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी ब्रिटिश वृत्तवाहिनीच्या मदतीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून, आपण अजूनही पंजशीरमध्येच आहोत. तसेच तालिबानविरोधातील हा संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे सालेह यांनी जाहीर केले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी हा अपप्रचार अपयशी ठरला. मात्र पाकिस्तानने केलेल्या या अपप्रचारामुळे शुक्रवारी काबुलमध्ये 17 जणांचा जीव गेला.

पंजशीरमध्ये विजय मिळाल्याच्या उन्मादात तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुल आणि नांगरहार प्रांताच्या जलालाबाद येथे हवेत गोळीबार केला. यामध्ये 17 जणांचा बळी गेला तर 50 जण जखमी झाले. तालिबानच्या उतावीळपणामुळे निष्पाप अफगाणींचा बळी जात असल्याची टीका या घटनेनंतर जोर पकडू लागली आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या तालिबानच्या नेत्यांना आपल्या दहशतवाद्यांची कानउघडणी करावी लागली.

दरम्यान, पंजशीरमधील संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे जवान तालिबानच्या दहशतवाद्यांना साथ देत असल्याचा आरोप नॉर्दन अलायन्स करीत आहे. संघर्षात ठार झालेल्यांपैकी काही जणांकडे पाकिस्तानी लष्कराचे ओळखपत्र सापडल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा दहशतवादी संघटना तालिबानच्या पाठिशी असल्याचे नव्याने उघड झाले आहे. यासाठीच पाकिस्तान पंजशीर खोऱ्याबाबत इतकी संवेदनशीलता दाखवित असल्याचे दिसते.

leave a reply