तेहरान/मॉस्को/दुशान्बे – अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेह यांच्या भावाची तालिबानच्या दहशतवाद्यांनी निघृणरित्या हत्या घडविली. त्याचबरोबर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पंजशीरमधील तालिबानच्या या कारवायांचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पंजशीरमधील तालिबानच्या हल्ल्यांचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नसल्याचा संताप इराणने व्यक्त केला. तर रशियाने ताजिकिस्तानच्या सीमेजवळ रणगाडे रवाना केले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानात हस्तक्षेप करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ताजिकिस्तानात पाऊल ठेवू देऊ नका, अशी मागणी ताजिक जनतेत जोर पकडत आहे.
पंजशीरमधील संघर्षात तालिबानच्या दहशतवाद्यांनी मानवता सोडून दिल्याचा आरोप नॉर्दन अलायन्स करीत आहेत. तालिबानने वीज तसेच पाणी पुरवठा बंद करून पंजशीरची कोंडी केली आहे. तालिबानचे दहशतवादी पंजशीरमधील मुले आणि वृद्धांनाही ठार करीत चालल्याचा भयंकर आरोप नॉर्दन अलायन्सने याआधी केला होता.
तर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरूल्ला सालेह यांच्या शोधासाठी पाकिस्तान तालिबानला सहाय्य करीत असल्याच्या बातम्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे स्पेशल फोर्सेसचे जवान तालिबानसह नॉर्दन अलायन्सविरोधात लढत आहेत. अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने याची माहिती दिली होती.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या हवाईदलाने सालेह यांच्या घरावर ड्रोन हल्ले चढविल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यावेळी सालेह घरामध्ये नव्हते. पण शुकवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी पंजशीरच्या ‘रूखा’ जिल्ह्यात सालेह यांचे बंधू रोहुल्ला सालेह यांची तालिबानने निघृणरित्या हत्या केली. त्यांचे शव दफन करण्याची परवानगी तालिबानने दिलेली नाही.
तालिबानच्या या कारवाईची माहिती माध्यमांमधून उघड झाल्यानंतर याआधी नॉर्दन अलायन्सला पाठिंबा देणारे रशिया, इराण आणि ताजिकिस्तानातून तीव्र पडसाद उमटले आहेत. रशियाने ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ १२ रणगाडे आणि लष्करी वाहने रवाना केली आहेत. ताजिकिस्तानबरोबरच्या लष्करी सरावासाठी ही तैनाती केल्याचे रशियाने म्हटले आहे. पण त्याचबरोबर अफगाणिस्तानातील दहशतवाद मध्य आशियाई देशांमध्ये देखील पसरू शकतो, अशी चिंता रशियाने व्यक्त केली आहे.
तर पंजशीरमधील तालिबानच्या हत्याकांडांचे अजिबात समर्थन करता येणार नसल्याचे ताशेरे संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त-रवांची यांनी ओढले आहेत. तालिबान आपल्याच अफगाण बांधवांचे हत्याकांड घडवित असल्याचा आरोप रवांनी यांनी केला. तसेच अफगाणिस्तानात मुक्त आणि पारदर्शी निवडणुकीची आवश्यकता असल्याचे सांगून तालिबानच्या राजवटीला आपली मान्यता नसल्याचे इराणच्या राजदूतांनी स्पष्ट केले.