वॉशिंग्टन/बीजिंग – गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली. यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, कोरोनाची साथ तसेच सायबरहल्ले व इंडो-पॅसिफिकचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेची भूमिका मांडल्याचा दावा बायडेन प्रशासन तसेच माध्यमांकडून करण्यात आला. तर, अमेरिकेच्या चीनविषयक धोरणामुळे दोन देशांमध्ये तणाव व संघर्षाची स्थिती उद्भवल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी ठेवल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे.
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून बोलणी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. या चर्चेनंतर बायडेन यांच्याकडून चीनसंदर्भात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांवर टीकेची झोड उठली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या कलाने निर्णय घेत असल्याचा आरोप अमेरिकेतील विरोधी पक्ष तसेच विश्लेषकांनी केला होता.
मात्र त्यानंतर गेल्या काही महिन्यात बायडेन प्रशासनाने चीनविरोधातील धोरण अधिक आक्रमक होत असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोना साथीच्या मुद्यावरून चीनवर करण्यात येणारी टीका, सायबरहल्ल्यांचा मुद्दा, तैवानसह इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत अमेरिकेने घेतलेली आक्रमक भूमिका हा त्याचा भाग मानला जातो. अमेरिकेच्या संरक्षणधोरणातही चीनचा उल्लेख सर्वात मोठा धोका म्हणून करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अमेरिकेने मित्रदेशांना एकत्र आणत चीनविरोधात आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यानच्या काळात अमेरिका व चीनच्या राजनैतिक अधिकार्यांमध्ये झालेल्या दोन बैठकांमध्ये तीव्र स्वरुपाचे खटके उडाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेने महासत्ता असल्याचा दावा सोडून बरोबरीच्या पातळीवर चर्चा करावी व उपदेशाचे डोस देऊ नयेत, असा आक्रमक पवित्रा चीनने घेतला होता. अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील माघारीचाही चीनने चांगलाच फायदा उचलला असून, अमेरिका कमकुवत बनल्याचे चित्र उभे करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकी तसेच चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, दोन नेत्यांमधील चर्चा जवळपास दीड तास चालली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, अमेरिका व चीनमध्ये असलेल्या स्पर्धेचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बायडेन यांनी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन अमेरिकेला सहाय्य करेल की नाही या चिंतेतून बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना फोन केल्याचा दावा चिनी माध्यमे करीत आहेत.
दोन्ही देशांनी एकत्र काम केले तर त्याचा फायदा संबंधित देशाला व जगालाही होऊ शकेल. तसे न होता संघर्ष झाला तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील, असा इशारा जिनपिंग यांनी दिल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी दैनिकाने म्हंटले आहे. अमेरिका ‘वन-चायना पॉलिसी’ बदलणार नाही, अशी ग्वाहीदेखील बायडेन यांनी दिल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले. याला अद्याप अमेरिकेने दुजोरा दिलेला नाही. पण ही बाब खरी असेल, तर बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली अमेरिका चीनसमोर झुकत असल्याचा आरोप यामुळे अधिकच तीव्र होईल. बायडेन यांच्या प्रशासनाने चीनच्या विरोधात काही हालचाली जरूर केल्या आहेत, पण त्या देखाव्यापुरत्या मर्यादित असल्याचा आरोप बायडेन यांचे विरोधक करीत आहेत.
अशा आरोपांची धार बायडेन यांच्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील चर्चेनंतर अधिकच तीव्र होणार आहे. सध्या अमेरिकेत बायडेन यांची लोकप्रियता घसरणीला लागली असून त्याचा फार मोठा फटका बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाला बसत आहे. अशा परिस्थितीतही बायडेन यांचे समर्थन करणारा माध्यमांचा गट त्यांचा बचाव करीत आहे. पण अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिका आपले महासत्तापद गमावण्याचा गंभीर धोका समोर असताना, बायडेन या प्रश्नावर अमेरिकी जनतेला विश्वासात घेण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.