वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सल्लागार असणार्या अँथनी फॉसी संसद व अमेरिकी जनतेशी खोटे बोलले असून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आता अमेरिकी जनतेकडूनही होत आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात जवळपास ५० टक्के मतदारांनी फॉसी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे समोर आले. अँथनी फॉसी यांनी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’चे प्रमुख म्हणून चीनच्या ‘वुहान लॅब’ला दिलेल्या निधीतून, प्राण्यांवर अत्यंत क्रूर असे प्रयोग करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. यावरून अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, फॉसी यांच्याविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
अमेरिकेतील ‘रासमुसेन रिपोर्टस्’ या गटाने काही दिवसांपूर्वी अँथनी फॉसी यांच्याबाबत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात, ४९ टक्के अमेरिकी मतदारांनी बायडेन यांचे सल्लागार असणारे फॉसी खोटे बोलत असल्याचा ठपका ठेवला. तर ४६ टक्के मतदारांनी फॉसी यांना जबरदस्तीने राजीनामा देणे भाग पाडायला हवे, अशी मागणी केली आहे. फक्त ३३ टक्के मतदारांनी फॉसी यांच्यावर वक्तव्यांवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. जवळपास २० टक्के मतदारांनी फॉसी यांच्या वक्तव्यांबाबत अनिश्चितता दर्शविली आहे.
सध्या फॉसी यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सल्लागारपदासह ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’चे प्रमुख पद आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून फॉसी यांनी चीनमधील ‘वुहान लॅब’ला मोठ्या प्रमाणात निधी पुरविल्याचे समोर आले आहे. यातील १६ लाख डॉलर्सचा निधी ‘बीगल’ या कुत्र्यांच्या जातीवर प्रयोग करण्यासाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे प्रयोग ‘गेन ऑफ फंक्शन रिसर्च’ प्रकारातील असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही सुमारे सहा लाख डॉलर्सचा निधी ‘वुहान लॅब’ला ‘बॅट कोरोनाव्हायरस रिसर्च’साठी देण्यात आला होता, असे कागदपत्रांमधून उघड झाले होते.
आता प्राण्यांवरील क्रूर प्रयोगाची माहिती समोर आल्याने अमेरिकी जनतेत असंतोषाची भावना तीव्र होऊ लागली आहे. अमेरिकी संसदेतील सिनेटर रँड पॉल यांनी फॉसी यांच्या राजीनाम्यासाठीची मोहीम अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. आपण खोटे बोललो होतो, हे फॉसी कधीच मान्य करणे शक्य नाही असा दावाही पॉल यांनी यावेळी केला. रँड पॉल यांच्यापूर्वी, रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणार्या जिम जॉर्डन यांनी फॉसी यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तर, अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीन यांनी ‘फायर फॉसी’ नावाचे विधेयकही संसदेत सादर केले होते.
सल्लागार अँथनी फॉसी यांनी गेल्या काही महिन्यात संसदेसमोर झालेल्या सुनावण्यांमध्ये चीनच्या ‘वुहान लॅब’ला ‘गेन ऑफ फंक्शन रिसर्च’ प्रकाराअंतर्गत निधी दिल्याचे वारंवार नाकारले होते. सिनेटर रँड पॉल यांच्यासह अमेरिकेतील अनेक संसद सदस्यांनी फॉसी यांना याविषयी वारंवार प्रश्न विचारले होते. मात्र त्यांनी सातत्याने ‘वुहान लॅब’च्या निधीशी असलेला संबंध नाकारला होता.