जपानमधील निवडणुकीत फुमिओ किशिदा यांना स्पष्ट बहुमत

टोकिओ – जपानमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत फुमिओ किशिदा यांच्या नेतृत्त्वाखाली लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीसह सत्ताधारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ४६५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने २९३ जागांवर विजय मिळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी‘ला २६१ तर सहकारी कोमितो पक्षाला ३२ जागा मिळाल्या आहेत. गेल्या महिन्यात फुमिओ किशिदा यांनी जपानचे नवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी निवडणुकीची घोषणा केली होती. किशिदा यांच्यापूर्वी पंतप्रधानपदी असणार्‍या योशिहिदे सुगा यांच्या धोरणांवरून असणार्‍या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर, जनतेकडून कौल मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

जपानमधील निवडणुकीत फुमिओ किशिदा यांना स्पष्ट बहुमतरविवारी झालेल्या मतदानापूर्वी जपानमधील सत्ताधारी आघाडीला फटका बसण्यासंदर्भातील दावे समोर आले होते. मात्र चीनविरोधातील आक्रमक भूमिका, आर्थिक धोरणांबाबत घेतलेला पुढाकार व कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी घट या मुद्यांनी किशिदा यांना हात दिल्याचे सांगण्यात येते. विरोधी पक्षांनी युती करून निवडणूक लढविली असली तरी धोरणांच्या आघाडीवर नवा अजेंडा ठेवण्यात ते अपयशी ठरल्याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

बहुमत मिळाल्यानंतर यापूर्वी जाहीर केलेले धोरण पुढे कायम राखण्यात येणार असून मंत्रिमंडळात कोणताही बदल न करण्याचे संकेत पंतप्रधान किशिदा यांनी दिले आहेत. चीनची आक्रमकता, कोरोनाची साथ व अर्थव्यवस्था या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी आघाडीला मिळालेले बहुमत निर्णायक ठरते, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply