ब्रुसेल्स/बर्लिन – युरोपिय देशांमध्ये सलग पाच आठवडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिली. सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असणारा युरोप हा एकमेव खंड असल्याकडेही ‘डब्ल्यूएचओ’ने लक्ष वेधले. जर्मनी, पोलंड व झेक रिपब्लिक या देशांमध्ये रुग्णसंख्या दरदिवशी नवे विक्रम नोंदवित असल्याचेही संघटनेने नमूद केले. युरोपातील पूर्व भागाला सर्वाधिक फटका बसला असून या क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींवर गेली आहे.
युरोपातील कोरोना रुग्णांची संख्या साडेसात कोटींनजिक पोहोचली असून बळींची आकडेवारी १४ लाखांवर गेली आहे. युरोप खंडातील बहुतांश देशांमध्ये रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून काही देशांनी निर्बंध लागू करण्याचाही निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात युरोपातील रुग्णसंख्येत १८ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यानंतर या आठवड्यात सहा टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आखाती देश, आग्नेय आशिया व आफ्रिकेतील रुग्णांची टक्केवारी घसरत असताना युरोपात आढळणारे नवे रुग्ण चिंतेची बाब ठरते असे, ‘डब्ल्यूएचओ युरोप’ने बजावले.
युरोपातील आघाडीचा देश असणार्या जर्मनीत गेले काही दिवस सतत रुग्णसंख्येत भर पडत आहे. गुरुवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर्मनीत २४ तासांच्या अवधीत ३३,९४९ रुग्णांची भर पडली. कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यानंतरचा हा उच्चांक ठरला आहे. २४ तासात कोरोनामुळे दगावणार्यांची संख्या १६५ असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्यात ही आकडेवारी १२६च्या आसपास होती. जर्मनीत कोरोनामुळे बळी जाणार्यांची एकूण संख्या ९६ हजारांवर जाऊन पोहोचली आहे.
जर्मनीबरोबरच ब्रिटन, फ्रान्स, पोलंड, झेक रिपब्लिक यासारख्या देशांमध्येही रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे. ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन आढळणार्या रुग्णांची संख्या ३० हजारांवर जाण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी ३ नोव्हेंबरला ब्रिटनमध्ये ४० हजारांवर रुग्ण नोंदविण्यात आले. गेल्या १४ दिवसात ब्रिटनमध्ये ४ लाख, ९० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. फ्रान्समध्येही प्रतिदिन आढळणार्या रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे.
झेक रिपब्लिकमध्ये २४ तासांमध्ये ९ हजार,९०२ रुग्ण आढळले असून हा मार्चनंतरचा उच्चांक ठरला आहे. या देशात प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे ३८२ जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. पोलंडमध्ये एका आठवड्यात रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असून २४ तासांमध्ये १० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासात दगावणार्यांची संख्याही १००च्या वर गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.
ऑगस्ट महिन्याच्या सुमारास, अनेक युरोपिय देशांनी लॉकडाऊन अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर युरोपातील अनेक देश पर्यटनासह इतर विविध क्षेत्रांसाठी खुले झाले होते. विविध युरोपिय देशांमध्ये सांस्कृतिक तसेच सार्वजनिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजनही सुरू झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या साथीची तीव्रता पुन्हा वाढू लागल्याचे समोर येत आहे. युरोपमधील हिवाळादेखील वाढत्या फैलावासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले.
चीनमध्ये कोरोनाचा वुहाननंतरचा सर्वात मोठा उद्रेक
बीजिंग – चीनच्या वुहानमध्ये २०१९ मध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर पुन्हा एकदा देशात साथीचा मोठा उद्रेक झाला आहे. चीनच्या ३१ पैकी १९ प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांमध्ये ७००हून अधिक जणांची भर पडली असून प्रतिदिन आढळणार्या रुग्णांची संख्या ९०च्या वर गेली आहे.
राजधानी बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचे ३८ रुग्ण आढळले आहेत. बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विंटर ऑलिंपिक’ स्पर्धा अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असताना आढळलेले हे रुग्ण चिनी यंत्रणांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. चीनमध्ये विविध कारणांमुळे उत्पादन क्षेत्र आधीच थंडावले आहे. त्यात कोरोनाच्या नव्या उद्रेकाची भर पडल्याने अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच तीव्र झाले आहे.