चीनच्या सीमेजवळील रस्ते बांधकामासाठी ‘आयटीबीपी’च्या इंजिनिअरिंग विंगची तैनाती

- केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली – चीनची ‘पिपल्स लिबरेशन आर्मी-पीएलए’ भारत-तिबेटच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रस्ते व पायाभूत सुविधांची उभारणी करीत आहे. त्याला उत्तर म्हणून गेल्या काही वर्षांपासून भारताने देखील चीनच्या सीमेजवळील रस्ते बांधकाम सुरू केले आहे. त्यातच या रस्ते बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी ‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस-आयटीबीपी’ची इंजिनिअरिंग विंग तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लडाख आणि अरुणालच प्रदेशच्या एलएसीजवळील बांधकामाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

भारताकडून अरुणाचल प्रदेश, लडाखसह अन्य सीमावर्ती भागात हाती घेण्यात येणार्‍या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना चीनकडून कायम विरोध केला जातो. पण चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून भारताने एलएसीजवळ रस्त्याचे जाळे उभारण्यासह अन्य पायाभूत सुविधांच्या विकास कामाला गती देण्यात आली आहे.

चीनच्या सीमेजवळील रस्ते बांधकामासाठी ‘आयटीबीपी’च्या इंजिनिअरिंग विंगची तैनाती - केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णयसीमेजवळील या रस्ते बांधकामांच्या प्रकल्पांची जबाबदारी प्रामुख्याने ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन-बीआरओ’वर असते. त्याचबरोबर ‘सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट-सीपीडब्ल्यूडी’ आणि इतर सरकारी विभागे एकत्र येऊन ही कामे करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या कामाचा वेग वाढल्याचा दावा केला जातो. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता सरकारकडून सीमेवर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येत आहे. त्यामुळे सीमेवर तातडीने जवानांची तैनाती करणे व युद्ध साहित्य पोहोचविणे सोपे होणार आहे.

त्याचबरोबर सरकारकडून इंडिया-चायना बॉर्डर रोड (आयसीबीआर) प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला गती देण्यात येत आहे. या टप्प्यात अनेक रस्ते उभारण्यात येणार आहेत. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमधील आकडेवावरीनूसार सीमेवर ५३८.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची उभारणी करण्यात आली आहे. रस्त्याचे हे जाळे अधिकाधीक विस्तारण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत.

अशा परिस्थितीत, रविवारी गृहमंत्रालयाने एलएसीजवळील या रस्तेबांधकामाचा वेग तीव्र करण्यासाठी आयटीबीपीलाही सामील केले आहे. आयटीबीपीचे इंजिनिअरिंग विंग रस्तेबांधकाम व संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागी होणार आहे. लवकरच इंजिनिअरिंग विंग सदर ठिकाणी तैनात केली जाईल.

याअंतर्गत सीमेवर ३२ रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार असून यातील तीन रस्त्यांचे काम इंडो तिबेटियन बॉर्डर कडून (आयटीबीपी) करण्यात येणार येईल. याचबरोबर १८ फूटी ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. यातील २ फूटी ट्रॅक आयटीबीपीकडून उभारण्यात येणार आहेत. दोन पोस्टला जोडण्याच्या उद्देशाने हे रस्ते उभारण्यात येत आहेत.

लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड सिक्किम, आणि हिमाचल प्रदेशमधील एकूण ३४८८ किलोमीटर लांब भारत-चीन सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी ‘आयटीबीपी’वर आहे. चीनलगतच्या सीमेवर ‘आयटीबीपी’च्या १८० सीमा चौक्या आहेत. या चौक्यांना जोडणारे एक ते दोन किलोमीटरचे रस्ते उभारण्याचे काम आयटीबीपी करेल.

leave a reply