टोकिओ/तैपई – नजिकच्या काळात तैवानवर हल्ला झालाच तर त्याच्या संरक्षणसाठी जपानदेखील संघर्षात उतरेल, अशी ग्वाही जपानी नेतृत्त्वाकडून वारंवार देण्यात देण्यात आली आहे. त्यासाठी जपानने जोरदार तयारीही सुरू केली असून तैवाननजिक असणार्या बेटावर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ तैनात करण्याचे संकेत दिले आहेत. जपानी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वीच जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवानजवळ असलेल्या बेटाला भेटही दिली होती.
जपानच्या ‘द ओकिनावा टाईम्स’ या दैनिकाने, योनागुनी आयलंडवरील नव्या तैनातीचे वृत्त दिले आहे. हे बेट तैवानपासून जवळच्या भागात आहे. या बेटावरून साध्या डोळ्यांनी तैवानची हद्द दिसते, असे सांगण्यात येते. जपान सरकारने या बेटावर संरक्षण तैनाती वाढविण्यास सुरुवात केली असून त्यात लष्करी तुकडी व टेहळणी तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’चा समावेश आहे. जपानच्या संरक्षणविभागाने योनागुनीवरील तैनातीसाठी तीन अब्ज येनची तरतूद केली आहे.
या तरतुदीनुसार, योनागुनी आयलंडवर नवी ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ कार्यरत करण्यात येणार आहे. त्याचवेळी या बेटावर तैनात असणार्या जवानांची संख्या २५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. यात लष्करी पथकासह हवाईदलाच्या पथकाचाही समावेश असणार आहे. तैवानच्या सागरी क्षेत्रासह ईस्ट चायना सीमधील चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात जपानने ईस्ट चायना सीमधील इशिगाकी बेटावर क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या क्षेपणास्त्रांमध्ये विमानभेदी तसेच विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश असेल, असे जपानकडून सांगण्यात आले होते. हे बेट तैवानच्या हद्दीपासून सुमारे ३०० किलोमीटर्स अंतरावर आहे. संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी याची घोषणा केली होती. त्याचवेळी किशी यांनी योनागुनी आयलंडला भेट दिल्याचेही समोर आले होते.
जपानने गेल्या काही महिन्यात चीनच्या विस्तारवादी कारवायांविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जपानच्या संरक्षण विभागाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्यात तैवानच्या सुरक्षेचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्याचवेळी चीनच्या तैवानवरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेबरोबर ‘सिक्रेट वॉरगेम्स’चेही आयोजन करण्यात आले होते.