बर्लिन/वॉशिंग्टन/किव्ह – शीतयुद्धाच्या काळात अण्वस्त्रसज्ज बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा तळ म्हणून ओळखण्यात येणारी युरोपियन कमांड अमेरिकेने पुन्हा एकदा कार्यान्वित केली आहे. सोमवारी अमेरिकी लष्करातील मेजर जनरल स्टिफन जे. मरानिअन यांनी या कमांडची सूत्रे स्वीकारत ती कार्यरत झाल्याचे जाहीर केले. या कमांडचे मुख्यालय जर्मनीतील अमेरिकी लष्कराचा तळ असणार्या विस्बॅडनजवळील ‘मेन्झ-कॅसल’मध्ये असेल, अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली. शीतयुद्ध संपल्यानंतर बंद करण्यात आलेली ही कमांड रशियाच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्रिय करण्यात आल्याचे दिसते.
गेल्या काही महिन्यात रशियाच्या युक्रेन तसेच बेलारुसमधील वाढत्या लष्करी हालचाली अमेरिकेसह युरोपिय देशांच्या चिंता वाढविणार्या ठरल्या आहेत. बेलारुसमध्ये नवा लष्करी तळ उभारण्याच्या हालचाली, सातत्याने होणारे सराव व ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्याचे संकेत पूर्व युरोपातील सुरक्षेला धोका ठरत असल्याचा इशारा नाटोने दिला आहे. त्याचवेळी युक्रेनच्या सीमेनजिक ८० ते ९० हजार जवानांची तैनाती करून रशियाने नव्या संघर्षाची तयारी सुरू केल्याचे दावे युक्रेन तसेच अमेरिकेतून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेसह नाटो सदस्य देशांनीही लष्करी हालचाली सुरू केल्या असून नवी कमांड सक्रिय करणे त्याचाच भाग दिसत आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्या महायुद्धाच्या काळात युरोपात ‘५६ फिल्ड आर्टिलरी कमांड’ उभारली होती. जर्मनीत असणार्या या कमांडमध्ये शीतयुद्धाच्या काळात आण्विक क्षमता असणारी ‘पर्शिंग मिसाईल सिस्टिम’ तैनात करण्यात आली होती. शीतयुद्धाच्या काळात युद्धसदृश स्थिती उद्भवली असताना या कमांडची जबाबदारी काही काळ नाटोकडेही सोपविण्यात आली होती. अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रांच्या तैनातीमुळे रशियाविरोधात सक्रिय व सज्ज असणार्या कमांडमधील आघाडीची कमांड ही याची ओळख होती.
अमेरिका व रशियामध्ये झालेल्या ‘आयएनएफ ट्रिटी’नंतर १९९१ साली ही कमांड बंद करण्यात आली होती. मात्र ‘आयएनएफ’मधून दोन्ही देशांनी घेतलेली माघार व रशियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शीतयुद्धकालिन कमांड पुन्हा एकदा सक्रिय केली आहे. जर्मनीतील मेन्झ-कॅसलमध्ये मुख्यालय असणार्या या कमांडमध्ये पुढील काळात ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ तसेच दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येतील, असे संकेत अमेरिकेच्या लष्करी सूत्रांकडून देण्यात आले आहेत. यात ‘डार्क ईगल’, ‘टायफॉन’ व ‘प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल’चा समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून रशियानजिक सुरू असलेल्या लष्करी हालचालींवर रशियाने नाराजी व्यक्त केली. अमेरिका व नाटोच्या नौदलाचा ब्लॅक सी सागरी क्षेत्रातील वावर वाढला असून या हालचाली म्हणजे रशियाची क्षमता तसेच सज्जता यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न असल्याकडे रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु म्हणाले. अमेरिका व नाटोच्या हालचालींवर रशियाची बारीक नजर असून रशिया त्याला योग्यवेळी प्रत्युत्तर देईल, असा इशाराही संरक्षणमंत्री शोईगू यांनी दिला आहे.