तेल अविव – शत्रूची रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, लढाऊ विमाने, संपर्क यंत्रणा इत्यादींचा वेध घेऊन ती निकामी करण्याची जबरदस्त क्षमता असलेली ‘स्कॉर्पियस बिम’ इस्रायलने विकसित केली. यामुळे शत्रूची क्षेपणास्त्रे, रॉकेट्स तसेच लढाऊ विमाने उडवून देण्यासाठी क्षेपणास्त्रांची आवश्यकता नाही, ‘स्कॉर्पियस बिम’ हे काम करू शकते, असा दावा याची निर्मिती करणार्या इस्रायली कंपनीने केला आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या ब्ल्यू फ्लॅग हवाईसरावात ‘स्कॉर्पियस टी’ बिमचा वापर झाला होता.
इस्रायलमधील सरकारसंलग्न ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रिज-आयएआय’ने दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी वापरता येतील असे ‘स्कॉर्पियस बिम’ सज्ज असल्याचे आयएआयच्या इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख एडी डल्बर्ग यांनी जाहीर केले. ‘शत्रूच्या हल्ल्यापासून इस्रायलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक यंत्रणांची सुरक्षा व शत्रूची इलेक्ट्रोमॅग्नेटिक यंत्रणा निकामी करण्याची क्षमता स्कॉर्पियस बिममध्ये आहे’, असे डल्बर्ग म्हणाले.
लढाऊ विमाने, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, विनाशिका, रडार यंत्रणा तसेच इतर धोके स्कॉर्पियस संपवू शकते, असा दावा इस्रायली कंपनीने केला. स्कॉर्पियस बिम बचावात्मक यंत्रणा असली तरी तिचा वापर हल्ले चढविण्यासाठी देखील होऊ शकतो. शत्रूची क्षेपणास्त्रे व यंत्रणा निकामी करण्यासाठी स्कॉर्पियसमधून क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली जाणार नाहीत. पण या बिमचा वापर करून शत्रूची क्षेपणास्त्रे व यंत्रणा निकामी केल्या जाऊ शकतात, अशी माहिती गिडॉन फुस्टिक या आयएआयच्या आणखी एका अधिकार्याने दिली.
येत्या काळातील युद्ध इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात लढली जातील, असे जगभरातील विश्लेषक सांगत आहेत. म्हणूनच स्कॉर्पियसच्या समावेशाने इस्रायलने स्वत:ला भविष्यातील युद्धासाठी सज्ज केले आहे, अशी घोषणा फुस्टिक यांनी केली. इस्रायली कंपनीने स्कॉर्पियसच्या चार आवृत्ती तयार केल्या असून यामध्ये जमिनीवरुन लक्ष्य करण्यासाठी ‘स्कॉर्पियस जी’, नौदलाच्या वापरासाठी ‘स्कॉर्पियस एन’, हवाईदलासाठी ‘स्कॉर्पियस पी’ तर प्रशिक्षणार्थींसाठी ‘स्कॉर्पियस टी’ या यंत्रणा असल्याचे इस्रायली कंपनीने म्हटले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस इस्रायलमध्ये ‘ब्ल्यू फ्लॅग’ बहुराष्ट्रीय हवाई सराव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, ग्रीस व इटली या देशांच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. या सरावात इस्रायलच्या संरक्षणदलांनी ‘स्कॉर्पियस टी’ तैनात केली होती. आंतरराष्ट्रीय हवाईसरावात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या यंत्रणेचा वापर झाल्याचे इस्रायली कंपनीने म्हटले आहे. प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी स्कॉर्पियस टी यंत्रणा अतिप्रगत लढाऊ विमानांना जोडून शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे तसेच इतर यंत्रणांना लक्ष्य करता येऊ शकते. त्यामुळे इस्रायलने इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायलने आयर्न डोमच्या धर्तीवर ‘आयर्न बिम’ आणि स्वतंत्र लेझर यंत्रणेची चाचणी घेतली होती. आत्ता इस्रायलने स्कॉर्पियस बिमची निर्मिती करून या प्रकारच्या युद्धतंत्रात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.