जहाजांचा मार्ग रोखणार्‍या चीनला फिलिपाईन्सचा इशारा

जहाजांचा मार्गमनिला – ‘फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात फिलिपाईन्सच्याच जहाजांचा मार्ग रोखून त्यांच्यावर पाण्याचे जोरकस फवारे मारणार्‍या चीनच्या कारवाया बेकायदेशीर आहेत. चीनने आपली जहाजे फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातून माघारी घ्यावी. अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण सहकार्य कराराअंतर्गत, फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेवर आहे, याची चीनने आठवण ठेवावी’, असा इशारा फिलिपाईन्सने दिला.

दोन दिवसांपूर्वी फिलिपाईन्सची दोन सहाय्यक जहाजे पलावान प्रांताजवळील ‘सेकन्ड थॉमस शोल’ या क्षेत्रातून प्रवास करीत होत्या. या सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या फिलिपाईन्सच्या जवानांसाठी अन्नधान्याचा साठा या जहाजांमध्ये होता. सदर सागरी क्षेत्र फिलिपाईन्सच्या अखत्यारित येते. असे असतानाही, चीनच्या तटरक्षकदलाच्या बोटींनी फिलिपाईन्सच्या जहाजांचा मार्ग रोखला तसेच त्यांच्यावर पाण्याचा मारा केला.

या कारवाईत फिलिपाईन्सच्या जवानांना दुखापत झाली नाही. पण चिनी जहाजांच्या हल्ल्यामुळे फिलिपाईन्सच्या सहाय्यक जहाजांना माघार घेऊन आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली. या पूर्ण घटनेवर फिलिपाईन्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने संताप व्यक्त केला व चीनला कठोर शब्दात ठणकावले.

चीनच्या गस्ती बोटींची फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील घुसखोरी व कारवाई बेकायदेशीर असल्याची टीका फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर लॉक्सिन ज्युुनिअर यांनी केली. चीनच्या तीन गस्ती बोटींनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप लॉक्सिन यांनी केला. या प्रक्षोभक कारवायांमुळे चीन व फिलिपाईन्समधील संबंध बिघडतील, असा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

त्याचबरोबर फिलिपाईन्स आणि अमेरिकेमधील संरक्षण सहकार्य कराराची आठवण लॉक्सिन यांनी करून दिली. या करारानुसार, फिलिपाईन्सच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिका लष्करी हस्तक्षेप करू शकतो. त्यामुळे चीनने लष्करी आव्हान दिल्यास फिलिपाईन्स अमेरिकेचे सहाय्य घेईल, असे संकेत लॉक्सिन देत आहेत.
दरम्यान, काही तासांपूर्वीच फिलिपाईन्स आणि व्हिएतनामने साऊथ चायना सीच्या क्षेत्रात संयुक्त वैज्ञानिक संशोधन मोहीम राबविण्याचे जाहीर केले आहे. सदर घोषणा चीनला आव्हान देणारी असल्याचा दावा केला जातो.

leave a reply