कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर्स प्रति बॅरलवर जातील

- रशियन इंधनकंपनीचा दावा

मॉस्को – इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक प्लस’ गटाकडून इंधनक्षेत्रातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता नसून त्यामुळे इंधनाचे दर पुढील वर्षात १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतात, असा दावा रशियन इंधनकंपनीने दिला आहे. या वर्षात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या इंधनाचे दर ८० डॉलर्स प्रति बॅरलहून अधिक असून हा २०१४ सालानंतरचा उच्चांक आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियन कंपनीचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर्स प्रति बॅरलवर जातील - रशियन इंधनकंपनीचा दावाजगातील आघाडीच्या इंधनकंपन्यांपैकी एक म्हणून ओळख असणार्‍या ‘रोझनेफ्ट’ या कंपनीचे उपाध्यक्ष ओटाबोक करिमोव्ह यांनी इंधनाच्या दरांमधील वाढीबाबत वक्तव्य केले. ‘कच्च्या तेलाची मागणी वाढत असताना ओपेक प्लस सदस्य देश त्याप्रमाणात उत्पादन वाढवू शकत नाहीत. इंधन उत्पादक सदस्य देशांकडून होणार्‍या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जगभरात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा फटका इंधनाच्या दरांना बसणार आहे. कच्च्या तेलाचे दर २०२२ सालच्या दुसर्‍या सहामाहीत १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळू शकतात’, असा इशारा करिमोव्ह यांनी दिला.

गेल्या काही महिन्यात कोरोना साथीच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इंधनाची तसेच वीजेची मागणी वाढू लागली आहे. मात्र त्याचवेळी कोळसा, नैसर्गिक इंधनवायू व कच्च्या तेलाचे उत्पादन मागणीच्या तुलनेत न वाढविल्याने, याच्या दरांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ या गटांमध्ये झालेल्या बैठकीत इंधनपुरवठा वाढविण्याच्या करारावर एकमत झाले होते. करारानुसार, ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सने वाढविण्यात आले आहे.कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर्स प्रति बॅरलवर जातील - रशियन इंधनकंपनीचा दावा

पण कच्च्या तेलाची मागणी वेगाने वाढत असून पुरवठा मर्यादित राहिल्याने दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ गटाला उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले होते. पण ओपेकने अमेरिकेची सूचना नाकारली असून आपल्या करारावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेलाच्या दरांमध्ये वाढ होण्याचे सत्र कायम राहिले आहे.

गेल्याच महिन्यात, कच्च्या तेलातील दरांच्या उसळीनंतर प्रमुख वित्तसंस्था व विश्‍लेषकांनी पुन्हा एकदा तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकतो, असे भाकित वर्तविले होते. या पार्श्‍वभूमीवर रशियन इंधनकंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेले वक्तव्य दरांमधील वाढीचे सत्र कायम राहण्याचे संकेत देणारे ठरतात.

leave a reply