येमेनमधील पाच महिन्यांच्या संघर्षात जवळपास १५ हजार हौथी बंडखोर ठार

- सौदीच्या नव्या कारवाईत २०० बंडखोरांना मारल्याचा दावा

हौथी बंडखोर ठारदुबई/रियाध – सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या आघाडीने गेल्या चोवीस तासात येमेनमध्ये केलेल्या हवाई कारवाईत दोनशेहून अधिक हौथी बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केला. इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स व हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या येमेनमधील ठिकाणांवर हे हल्ले चढविल्याचे सौदीप्रणित लष्करी आघाडीचे म्हणणे आहे. दरम्यान, जून महिन्यापासून सौदी व अरब मित्रदेशांनी येमेनमधील कारवाईत १४,७०० हौथी बंडखोरांना ठार केले आहे.

सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने गेल्या चोवीस तासात येमेनमध्ये मोठी कारवाई केली. येमेनमधील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स तसेच इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले चढविल्याचे हौथी बंडखोर ठारअरब देशांच्या लष्करी आघाडीने जाहीर केले. यामध्ये राजधानी सनामधील अल-दुलैमी हवाईतळ, शस्त्रास्त्रांचे कोठार त्याचबरोबर सादा, धमर आणि अल-जावफ प्रांतातील ठिकणांचा समावेश होता.

या हवाई हल्ल्याचे सारे तपशील आलेले नाहीत. पण सौदी व अरब देशांनी येमेनमधील इराणच्या हितसंबंधांना लक्ष्य करून कडक संदेश दिल्याचा दावा केला जातो. याबरोबर अरब देशांच्या लष्करी आघाडीने मरिब आणि अल-जावफ या भागातील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर जोदार हल्ले चढविले. यात दोनशेहून अधिक हौथी बंडखोर ठार झाल्याचे अरब देशांच्या लष्कराने म्हटले आहे.

हौथी बंडखोर ठारगुरुवारी झालेल्या या हल्ल्याची माहिती हौथी बंडखोरांनी जाहीर करण्याचे टाळले. पण हौथीसंलग्न वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी सनाच्या उत्तर व दक्षिणेकडील भागांवर अरब देशांच्या विमानांनी हल्ले चढविले. काही तासांपूर्वी हौथी बंडखोरांनी सौदीच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन्सचा हल्ला चढविला होता. सौदीच्या यंत्रणांनी या हल्ला उधळला. पण त्यानंतर अरब देशांचे हल्ले तीव्र झाल्याचे सदर वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

इंधनसंपन्न मरिब प्रांतावर नियंत्रण मिळविण्यासाठी सौदी व अरब देशांचे लष्कर हौथी बंडखोरांवर जोरदार हल्ले चढवित असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या हल्ल्यांमध्ये हौथींची जबर जीवितहानी केल्याचा दावा अरब देशांकडून केला जातो. हौथींनी आत्तापर्यंत खुलासा केला नव्हता. पण हौथी संघटनेशी संलग्न असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनपासूनच्या संघर्षात १४,७०० बंडखोर ठार झाले आहेत. हा हौथींना पाठिंबा देणार्‍या इराणसाठी मोठा धक्का असल्याचा दावा केला जातो.

leave a reply