मनामा – ‘इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. त्यासाठी अमेरिका राजनैतिक स्तरावर प्रयत्न करीत आहे. पण इराण अणुकराराबाबत गंभीर नसेल तर मग अमेरिकेला इतर पर्यायांचा विचार करावाच लागेल’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला.
येत्या काही दिवसात व्हिएन्ना येथे अमेरिका, युरोपिय महासंघ आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू होणार आहेत. त्याआधी आखाती मित्रदेशांचा विश्वास जिंकण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, बाहरिन येथील वार्षिक ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज्-आयआयएसएस’च्या बैठकीत बोलताना अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणबाबत इतर पर्यायांचा वापर केला जाईल, असा इशारा दिला.
पण या पर्यायांचा विचार करण्याच्या आधी बायडेन प्रशासन इराणबरोबर वाटाघाटी करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. या वाटाघाटींसाठी वेळ काढून इराण आपला अणुकार्यक्रम पुढे रेटत असल्याची टीका इस्रायल करीत आहे. इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याचे इशारे दिले आहेत. यासाठी व्हिएन्ना येथील चर्चेत होणार्या निर्णयांची प्रतिक्षा करणार नसल्याचे स्पष्ट संकेत इस्रायलने दिले आहेत. इराणवर कारवाईसाठी इस्रायलला बायडेन प्रशासनाचा पाठिंबा मिळणार नाही, हे गृहित धरून इस्रायलने इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्यावा, असा सल्ला अमेरिकेचे विरोधी पक्षनेते देत आहेत.