तेल अविव – छाबहार तसेच केशम बेटावर उभारलेल्या ड्रोन तळाचा वापर करून इराण मालवाहू व इंधनवाहू जहाजांना लक्ष्य करीत आहे. इराणच्या या ड्रोनपासून संपूर्ण जागतिक व्यापारी वाहतुकीला धोका संभवतो, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. यासाठी सौदी अरेबियाच्या अराम्को इंधन प्रकल्पावर झालेल्या ड्रोन्सच्या हल्ल्याचा दाखला इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला.
गेल्या काही आठवड्यांमध्ये सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्या मालवाहू जहाजांवर संशयास्पद हल्ले वाढले आहेत. यातील दोन वेळा जहाजांवर ड्रोन हल्ले झाले होते. यामागे इराण असल्याचा आरोप इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केला. इराणने दोन छुप्या ठिकाणांहून हे ड्रोन प्रक्षेपित केले होते. इराणच्या छाबहार विमानतळावर अशा ड्रोन्ससाठी स्वतंत्र शेड तयार केली असून येथील धावपट्टीवरुन ड्रोन प्रक्षेपित केले जात असल्याची माहिती संरक्षणमंत्री गांत्झ यांनी एका कार्यक्रमात दिली.
तर होर्मुझच्या आखातात असलेल्या केशम बेटावर इराणने छुपा ड्रोन तळ उभारला आहे. इथूनच ड्रोनचा हल्ला चढविण्यात आला होता. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी या दोन्ही ठिकाणांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले. या तळावर तैनात असलेल्या ड्रोन्सची माहिती संरक्षणमंत्री गांत्झ यांनी उपस्थितांना दिली. त्याचबरोबर इराणचा हा ड्रोन तळ इस्रायलच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोकादायक असल्याचा इशारा गांत्झ यांनी दिला.
‘हिजबुल्लाहच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी इराणने सिरियातून इस्रायलच्या हद्दीत ड्रोन धाडले होते’, असा आरोप इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. काही महिन्यांपूर्वी सिरियातून टीएनटी स्फोटकांनी भरलेला ड्रोन वेस्ट बँकमध्ये उतरविण्याची इराणची योजना होती. वेस्ट बँकमधील दहशतवाद्यांना शस्त्रसज्ज करण्याची इराणचे कारस्थान होते. पण इस्रायली यंत्रणांनी इराणचा हा डाव हाणून पाडल्याचे गांत्झ म्हणाले.