असियानच्या बैठकीमध्ये फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांची चीनवर टीका

असियानबीजिंग/मनिला – ‘चीन कधीही छोट्या देशांवर वर्चस्व गाजवित नाही किंवा त्यांच्यावर दादागिरी करीत नाही किंवा त्यांचा भूभाग बळावत नाही’, असा हास्यास्पद दावा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी असियानच्या बैठकीत केला. पण चीन अध्यक्षपद भूषवित असलेल्या या बैठकीत फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला आरसा दाखविला. गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून चीनच्या जहाजांनी केलेली कारवाई निंदनीय असल्याचे ताशेरे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी ओढले.

आग्नेय आशियाई देशांची ‘असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स-असियान’ या संघटनेच्या चीनबरोबरील सहकार्याला तीन दशके पूर्ण होत आहेत. या निमित्ताने चीनची राजधानी बीजिंगमध्ये असियान देशांच्या व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन केले आहे. सोमवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या बैठकीची सुरुवात करताना चीनचे आग्नेय आशियाई देशांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध असल्याचा दावा केला. त्याचबरोबर चीनने कधीही आपल्या शेजारी देशांवर वर्चस्व, दादागिरी दाखविली नसल्याचे किंवा त्यांच्या भूभागाचा ताबा घेतलेला नाही, असे विधान जिनपिंग यांनी केले.

या व्हर्च्युल बैठकीत फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडताना, गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात चिनी जहाजांनी केलेल्या घुसखोरीचा उल्लेख केला. ‘‘फिलिपाईन्सच्या आयुंगीन (सेकंड थॉमस शोल) सागरी क्षेत्रात घडलेली घटना निंदनीय आहे. या आणि यासारख्या इतर घटना फिलिपाईन्सच्या चिंता वाढवित आहेत’’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चिनी जहाजांच्या घुसखोरीवर टीका केली. ‘ही घटना फिलिपाईन्स आणि चीनमधील संबंध आणि सहकार्यासाठी चांगली ठरणार नाही’, असा इशारा राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी दिला.

गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सची दोन सहाय्यक जहाजे सेकंड थॉमस शोल क्षेत्रात तैनात असलेल्या आपल्या जवानांसाठी अन्नधान्याचा साठा घेऊन प्रवास करीत होत्या. त्यावेळी चीनच्या तटरक्षकदलाच्या बोटींनी फिलिपाईन्सच्या जहाजांचा मार्ग रोखला तसेच त्यांच्यावर पाण्याचा मारा केला होता. यानंतर फिलिपाईन्सच्या जहाजांनी माघार घेतली होती. पण सोमवारी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनला खडसावल्यानंतर, फिलिपाईन्सने चीनची पर्वा न करता सेकंड थॉमस शोल भागात आपली जहाजे नव्याने रवाना केली.

फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी व्हर्च्युअल बैठकीत चीनवर टीका केली तेव्हा, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग उपस्थित होते का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण चीनच्या अध्यक्षतेत होणार्‍या बैठकीतच राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनला खडसावल्यामुळे हा मुद्दा गाजत आहे. गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर लॉक्सिन ज्युनिअर यांनी चीनच्या गस्ती बोटींची फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील घुसखोरी व कारवाई बेकायदेशीर असल्याची टीका केली होती.

त्याचबरोबर, फिलिपाईन्स आणि अमेरिकेमधील संरक्षण सहकार्य कराराची आठवण लॉक्सिन यांनी करून दिली होती. या करारानुसार, फिलिपाईन्सच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिका लष्करी हस्तक्षेप करू शकते. त्यामुळे चीनने लष्करी आव्हान दिल्यास फिलिपाईन्स अमेरिकेचे सहाय्य घेईल, असे संकेत लॉक्सिन यांनी दिले होते.

दरम्यान, आग्नेय आशियाई देश उघडपणे चीनविरोधात भूमिका घेत असल्याचा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वीच असियानने म्यानमारमधील जुंटा राजवटीला पाठिंबा देणार्‍या चीनवर टीका केली होती. त्यामुळे असियान देशांचा चीनच्या विरोधातील असंतोष वाढत चालल्याचे दिसत आहे.

leave a reply