लिथिअम मिळविण्यासाठी चीनचे पथक अफगाणिस्तानात दाखल

लिथिअमकाबुल/बीजिंग – अफगाणिस्तानातील ट्रिलियन डॉलर्सच्या ‘रेअर अर्थ’ अर्थात दुर्मिळ खनिजांच्या शोधासाठी चीनच्या पाच कंपन्यांचे पथक अफगाणिस्तानात दाखल झाले आहेत. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने याची माहिती प्रसिद्ध केली. या दुर्मिळ खनिजांपैकी लिथिअमचा साठा मिळविण्यासाठी चीनचे प्रयत्न करीत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून चीन या दहशतवादी संघटनेच्या मदतीला धावून आला आहे. तालिबानला आर्थिक सहाय्य पुरविण्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानच्या राजवटीला मान्यता मिळवून देण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका व नाटोच्या माघारीनंतर चीन अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्याची तयारी करीत असल्याचा आरोप केला जातो. अफगाणिस्तानातील जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्स इतका दुर्मिळ खनिजसंपत्तीचा साठा चीनच्या या हालचालींमागे असल्याचे बोलले जाते.

यासाठी चीनच्या राजवटीने अफगाणिस्तानसाठी पाच बड्या कंपन्यांचे पथक स्पेशल व्हिसा देऊन रवाना केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हे शिष्टमंडळ अफगाणिस्तानात दाखल झाले होते. चीनच्या सरकारी मुखपत्राने या भेटीबाबतचे अधिक तपशील प्रसिद्ध केलेले नाहीत. पण अफगाणिस्तानातील सुरक्षा, स्थैर्य, अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा अभाव हे चिनी कंपन्यांच्या चिंतेचे कारण असल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तान म्हणजे ‘लिथिअमसंपन्न सौदी अरेबिया’ असल्याचा दावा दशकभरापूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात केला होता. मायक्रोचिप्सपासून ते इलेक्ट्रिक कारसाठी वापरल्या जाणार्‍या अफगाणिस्तानातील लिथिअमच्या साठ्यावर चीनचा डोळा असून हा साठा चीनला मिळवून देण्यासाठी पाकिस्तान सहाय्य करीत असल्याचा आरोप विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply