वॉशिंग्टन – पृथ्वीच्या दिशेने येणार्या लघुग्रहाचा मार्ग बदलण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी बुधवारी नासाने ‘डार्ट’(डबल ऍस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट) अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित केले. हे अंतराळयान नासाकडून राबविण्यात येणार्या ‘प्लॅनेटरी डिफेन्स मिशन’चा भाग आहे. या उपक्रमाअंतर्गत, पृथ्वीच्या कक्षेत येऊन हानी करण्याची शक्यता असणार्या घटकांविरोधात सुरक्षाव्यवस्था उभारण्याची तयारी सुरू आहे. ‘डार्ट’चे प्रक्षेपण हे प्लॅनेटरी डिफेन्स मिशन’अंतर्गत राबविण्यात येणारी पहिलीच मोहीम आहे.
बुधवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास ‘स्पेसेक्स’ कंपनीच्या ‘फाल्कन ९ रॉकेट’च्या सहाय्याने ‘डार्ट’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे अंतराळयान ६८ लाख मैलांचा प्रवास करून ‘डिमॉर्फोस’ नावाच्या लघुग्रहाला धडकणार आहे. या लघुग्रहाचा पृथ्वीला थेट धोका नसला तरी या टकरीचे परिणाम भविष्यात पृथ्वीच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरतील, असे नासाकडून सांगण्यात आले. ‘डार्ट’ची मोहीम १० महिन्यांची असून पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात हे यान लघुग्रहाला धडकेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘डार्ट हे यान डिमॉर्फोसची कक्षा काही प्रमाणात बदलणार आहे. पण हीच बाब महत्त्वाची आहे. लघुग्रहाबद्दल आधी इशारा मिळाल्यानंतर हीच माहिती महत्त्वाची ठरेल’, असे नासाच्या वरिष्ठ अधिकारी केली फास्ट यांनी स्पष्ट केले. डिमॉर्फोस हा १६० मीटर व्यासाचा लघुग्रह असून त्याच्याबरोबर ‘डिडिमॉस’ हा मोठा लघुग्रहही असेल, असे सांगण्यात येते.
सध्या अंतराळात २७ हजारांहून अधिक लघुग्रह व इतर घटक फिरत असून नजिकच्या काळात ते पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. मात्र भविष्यात एखाद्या धोकादायक लघुग्रहाचा शोध लागल्यास त्याला रोखण्यासाठी ‘डार्ट’मधून मिळालेले निष्कर्ष उपयुक्त ठरु शकतात, असा दावा नासाच्या संशोधकांनी केला आहे. ‘डार्ट’च्या मोहिमेत ‘कायनेटिक इम्पॅक्ट’ हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून अंतराळयान प्रति सेकंद सहा किलोमीटर इतक्या वेगाने धडकणार आहे.