बैरुत/रियाध – येमेनमधील संघर्षावरून सौदी अरेबिया व अरब देशांवर टीका करणारे लेबेनॉनचे माहितीमंत्री जॉर्ज कुर्दोही यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. सौदीसह इतर अरब देशांबरोबर निर्माण झालेला राजनैतिक तणाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कुर्दोही यांनी स्पष्ट केले. अरब देशांविरोधात वक्तव्य केल्याने राजीनामा द्यावा लागलेले कुर्दोही हे लेबेनॉनमधील दुसरे मंत्री ठरले आहेत. यापूर्वी मे महिन्यात लेबेनॉनचे परराष्ट्रमंत्री शार्बेल वेहब यांनाही राजीनामा देणे भाग पडले होते.
ऑक्टोबर महिन्यात, लेबेनॉनचे नवनियुक्त माहिती मंत्री जॉर्ज कुर्दोही यांचा एक व्हिडिओ लेबेनीज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता. या व्हिडिओमध्ये येमेनमधील गृहयुद्धाबाबत बोलताना कुर्दोही यांनी, हौथी बंडखोर परकीयांच्या आक्रमणापासून आत्मरक्षण करीत असल्याचे सांगून सौदी व अरब मित्रदेशांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावर अरब देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. सौदी अरेबिया, युएई, बाहरिन तसेच कुवेतने बाहरिनच्या राजदूतांची हकालपट्टी केली होती.
त्यानंतर सौदीने लेबेनॉनमधील आयातीवर बंदी घातली होती. लेबेनॉनची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून हा देश सध्या आखाती देश, युरोप व आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून मिळणार्या अर्थसहाय्यावर अवलंबून असल्याचे मानले जाते. चलनाचे मूल्य घसरले असून परदेशी कर्जाची परतफेड तसेच आवश्यक आयातीसाठीही पुरेसा निधी नसल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत सौदीने घातलेली बंदी लेबेनीज अर्थव्यवस्थेला नवा धक्का ठरला होता.
लेबेनालनला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे माहितीमंत्री जॉर्ज कुर्दोही यांनी सांगितले. या राजीनाम्यावर अरब देशांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.