नवी दिल्ली – ‘भारतीय सार्स-कोव्ह-२ जिनोम सिक्वेन्सिंग कंसोर्टियम’(आयएनएसएसीओजी-इन्साकॉग) या सरकारनेच स्थापन केलेल्या पॅनलच्या संशोधकांनी बुस्टर डोसबाबत सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. आतापर्यंत ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्यात यावे, त्याचबरोबर चाळीस वर्षांवरील नागरिकांना लसीचा बुस्टर डोस देण्यात यावा, इन्साकॉगने आपल्या शिफारसीत म्हटले आहे.
कोरोनाचा नवा ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंट आल्यावर अतिशय वेगाने तो जगातील विविध देशात पोहोचत आहे. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा तिसरा बुस्टर डोस देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी आधीच आपल्या देशात बुस्टर डोससाठी मंजुरी दिली आहे. या देशातही चाळीस वर्षातील वरील नागरिकांना लसीचा बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुस्टर डोसमुळे नागरिकांच्या कोरोनाविराधातील रोगप्रतिकार शक्तीमध्ये आणखी वाढ होईल आणि त्यांना दीर्घकाळासाठी संरक्षण मिळेल, असे दावे केले जात आहेत.
लॅन्सेट जर्नलमध्येही बुस्टर डोसबाबत एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये कोरोनाच्या लसीचे डोस घेतल्यानंतर कोरोनाविरोधात मिळणारे संरक्षण काही काळानंतर कमी होत जाते. अशावेळी बुस्टर डोसमुळे अधिक सुरक्षा मिळेल आणि आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होईल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तसेच ऍस्ट्राझेनिका, फायजर, नोव्हॅक्स, जॉन्सर्न, मॉडर्ना आणि क्यूरव्हॅक या सहा लसींचे बुस्टर डोस सुरक्षित असल्याचेही या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानही काही लोकप्रतिनिधींनी बुस्टर डोसबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुस्टर डोस देण्याबाबतचा निर्णय हा तज्ज्ञांकडून आलेल्या वैज्ञानिक सल्ल्यानुसार घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच लहान मुलांना लस देण्याचा निर्णयही तज्ज्ञांच्या सल्ल्याने सरकार घेईल, असेही मंडाविया म्हणाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या विषाणूमध्ये होणारे जिनोमिक फरकावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळेचे नेटवर्क ‘इन्साकॉग’च्या संशोधकांनीही बुस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. ‘इन्साकॉग’कडून जारी करण्यात आलेल्या साप्ताहिक बुलेटनमध्ये याचा उल्लेख करण्यात अला आहे. आतापर्यंत ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण पूर्ण करणे आणि ४० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्याला प्राधान्य असावे, असा सल्ला ‘इन्साकॉग’च्या संशोधकांनी दिला आहे. बुस्टर डोस देतानाही जास्त धोका असलेल्या नागरिकांचे प्रथम लसीकरण करण्यात यावे, असेही ‘इन्साकॉग’ने म्हटले आहे. यामुळे कमी ऍन्टीबॉडी असलेल्यांना ‘ओमिक्रॉन’सारख्या व्हेरिअंटशी लढण्यासाठी चांगल्या ऍन्टीबॉडी तयार होतील, असा दावा इन्साकॉगने केला आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी जिनॉमिक तपासणी आवश्यक आहे. यामुळे जनतेच्या आरोग्यासंदर्भात वेगाने पावले उचलणे शक्य होते, असेही ‘इन्साकॉग’ने अधोरेखित केले. तसेच रुग्ण सापडत असलेल्या भागात चाचण्या वाढवा, प्रवाशांचे ट्रॅकिंग करा, अशी शिफारसही ‘इन्साकॉग’ केली.