वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची सत्ता उलथविण्यासाठी दोन ते तीन कोटी अमेरिकन्स हातात शस्त्र घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा अमेरिकी विश्लेषक जॉन हेलेमान यांनी केला. ‘एमएसएनबीसी’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना हेलेमान यांनी हा दावा केला. अमेरिकी वेबसाईट ‘द अटलांटिक’वर प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा आधार घेऊन हेलेमान यांनी सदर वक्तव्य केले आहे.
रविवारी ‘एमएसएनबीसी’ या वृत्तवाहिनीवरील ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेतील लोकशाही या मुद्यावर चर्चा झाली. यात निवेदक चक टॉड यांनी ‘द अटलांटिक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा उल्लेख केला. ‘ट्रम्पस् नेक्स्ट कॉप हॉज ऑलरेडी बिगन’ असे या लेखाचे नाव आहे. यात पत्रकार बार्टन गेलमन यांनी, डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या समर्थकांनी २०२४ साली व्हाईट हाऊसची सूत्रे हाती घ्यायची जय्यत तयारी सुरू केल्याचे म्हटले आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया, ती राबविणारी यंत्रणा आणि त्याच्याशी निगडित असलेले कायदे व तरतुदींचा वापर करण्यात येईल, असे संकेत गेलमन यांनी दिले आहेत.
याच लेखात त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये हिंसेचे समर्थन करणार्यांचा हिस्सा मोठा असून प्रसंगी शस्त्राचा वापरही करण्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भातील माहितीचा आधार घेऊन विश्लेषक हेलेमान यांनी अमेरिकेतील दोन ते तीन कोटी नागरिक बायडेन यांची सत्ता उलथण्यासाठी शस्त्र उचलू शकतात, असे वक्तव्य केले. ‘अमेरिकेतील सुमारे ८ ते १२ टक्के मतदार आजही बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे, असे मानतात. बायडेन यांचे सरकार उलथवून त्याजागी ट्रम्प यांना बसविण्यासाठी हिंसा हादेखील मार्ग असल्याचे या गटाला मान्य आहे. ही संख्या दोन ते तीन कोटींपर्यंत जाते व हे नागरिक हाती शस्त्र घेण्यास तयार आहेत’, असा दावा जॉन हेलेमान यांनी केला.
हाती शस्त्र घेण्यास तयार असलेला हा गट ट्रम्प यांच्या समर्थकांचा असून ते त्यातून राजकीय हिंसेला पाठिंबा देणारी चळवळ उभी राहिली आहे, असेही हेलेमान यांनी म्हटले आहे. हेलेमान यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्यांचे वक्तव्य बेजबाबदार पत्रकारितेचा भाग असल्याची टीका केली आहे.