फ्लोरिडा – ‘इराणने लेबेनॉनमधील हिजबुल्लाहला इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविण्याचे आदेश दिले तर, इस्रायलने थेट इराणलाच लक्ष्य करावे. तिसरे लेबेनॉन युद्ध टाळायचे असेल तर इस्रायलने पहिल्या इराण युद्धासाठी सज्ज रहावे’, अशी घोषणा इस्रायलच्या विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते नीर बरकत यांनी केली.
जेरूसलेमचे माजी महापौर राहिलेले बरकत हे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या लिकूड पक्षाचे वरिष्ठ संसद सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी बरकत यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. ‘इस्रायली-अमेरिकन काऊन्सिल’च्या परिषदेला संबोधित करताना बरकत यांनी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबाबत इस्रायलने अधिक आक्रमक भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. दहशतवादी संघटनांचे नेतृत्व करणार्या इराणमध्ये कट्टरपंथी राजवट असून अणुबॉम्बची निर्मिती हे या गटाचा मुख्य हेतू असल्याचे बरकत यांनी सांगितले.
इस्रायल सध्या जवळपास अडीच लाख क्षेपणास्त्रांनी घेरलेला आहे. अशा परिस्थितीत, हे क्षेपणास्त्र हल्ले चढविणार्या इराणसंलग्न दहशतवादी गटांना उत्तर देण्यापेक्षा इस्रायलने थेट इराणवरच हल्ले चढवावे, असे बरकत यांनी सुचविले. यामुळे तिसरे लेबेनॉन युद्ध टळेल, मात्र इराणबरोबरचे पहिले युद्ध सुरू होईल. यासाठी इस्रायलने सज्जता ठेवावी, असे आवाहन बरकत यांनी केले आहे.