अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया पॅसिफिक क्षेत्रात अंडरसी केबल टाकणार

अंडरसी केबलवॉशिंग्टन/कॅनबेरा – इंडो-पॅसिफिकमधील छोटे देश चीनकडून राबविण्यात येणार्‍या शिकारी अर्थनीतिच्या धोरणाला बळी पडू नयेत यासाठी अमेरिकेसह मित्रदेशांनी पुढाकार घेतला आहे. पॅसिफिक क्षेत्रातील तीन छोट्या बेटदेशांसाठी अंडरसी केबल उभारण्यावर अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचे एकमत झाले आहे. अंडरसी केबलच्या माध्यमातून पॅसिफिक देशांना इंटरनेट सेवा पुरविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लंडनमध्ये पार पडलेल्या जी७ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. या चर्चेनंतर तिन्ही देशांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पॅसिफिक देशांसाठी उभारण्यात येणार्‍या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. ‘नाऊरु, किरिबाती व फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिआ या बेटांना वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी अंडरसी केबल उभारून देण्यात येईल. या प्रकल्पामुळे पॅसिफिक बेटदेशांचा आर्थिक प्रगतीला सहाय्य होईल तसेच या देशांमधील जनतेचे जीवनमान सुधारेल’, असे संयुक्त निवेदनात सांगण्यात आले.

अंडरसी केबलसदर प्रकल्प फक्त पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबरील वाढत्या भागीदारीचे संकेत आहेत, अशी ग्वाही संयुक्त निवेदनात देण्यात आली आहे. अंडरसी केबलच्या प्रकल्पासाठी वर्ल्ड बँक तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचेही सहाय्य घेण्यात येईल, असेही तिन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आले. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाचा नवा प्रकल्प चीनकडून या क्षेत्रातील वाढत्या हालचालींना शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

अंडरसी केबलगेल्या दशकभरात चीनने पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांमध्ये जवळपास एक अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. या गुंतवणुकीच्या बळावर चीन या छोट्या देशांमधील मोक्याच्या जागा बळकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेश ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेच्या गुआम या संरक्षणतळापासून जवळच्या अंतरावर आहेत. त्यामुळे बेटदेशांवर संरक्षणतळ अथवा लष्करी सुविधा उभारून अमेरिका व ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याचे चीनचे इरादे आहेत.

चीनचे हे इरादे हाणून पाडण्यासाठी अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया व जपान सक्रिय झाले आहेत. या तिन्ही देशांनी पॅसिफिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने काही वर्षांपूर्वी सुमारे १० कोटी डॉलर्स खर्च करून पापुआ न्यू गिनी तसेच सॉलोमन आयलंड या बेटदेशांसाठी अंडरसी केबल उभारून दिली होती. नव्या केबल प्रकल्पासाठीही ऑस्ट्रेलियानेच पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.

leave a reply