अंकारा – किमान अर्ध्या किलोमीटर अंतरावरील लक्ष्य नष्ट करणार्या लेझरसज्ज ड्रोनची चाचणी घेतल्याचे तुर्कीने जाहीर केले. लेझरने सज्ज असलेले हे जगातील पहिले ड्रोन असल्याचा दावा तुर्कीने केला. सुमारे तीन हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करणार्या या ड्रोनच्या आणखी काही चाचण्या झाल्यानंतर त्याचा लष्करात समावेश होईल, अशी घोषणा तुर्कीने केली.
दोन दिवसांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकूत एर्दोग्दू यांनी ड्रोन चाचणीची माहिती माध्यमांना दिली. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या ‘तुबीतक’ या कंपनीने निर्मिती केलेल्या ‘एरेन’ ड्रोनची नुकतीच चाचणी पार पडल्याचे एर्दोग्दू यांनी सांगितले. एरेन ड्रोन लेझरने सज्ज असून बॉम्ब किंवा इतर हवाई लक्ष्य भेदण्याची क्षमता यात असल्याचे तुर्कीच्या माध्यमांनी एर्दोग्दू यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले.
एरेन ड्रोनने अर्ध्या किलोमीटर अंतरावरील तीन मिलीमीटर जाडीची कार्बन स्टिलची प्लेट भेदण्यासाठी ९० सेकंद घेतली. तर १०० मीटर अंतरावरुन हीच प्लेट भेदण्यासाठी फक्त १० सेकंदांचा अवधी लागल्याचे एर्दोग्दू म्हणाले. त्यामुळे तुर्कीचे लष्कर लवकरच जगातील पहिल्या आणि सर्वात भेदक लेझर ड्रोनने सज्ज होणार असल्याचा दावा एर्दोग्दू यांनी केला.
एरेन ड्रोनचे अधिक तपशील उघड होऊ शकलेले नाहीत. पण या ड्रोनची निर्मिती करणार्या कंपनीने याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. तसेच येत्या काळात तुर्की या ड्रोनची विक्री देखील करू शकतो, असेही तुर्कीचे नेते सांगत आहेत. ड्रोन्स निर्मितीच्या क्षेत्रात तुर्की करीत असलेली प्रगती रशियासह युरोपिय देशांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. तुर्कीच्या ‘बेरक्तार टीबी-२’ ड्रोन्सची विक्री वाढली आहे.
अमेरिकेच्या ‘एमक्यू-९ रिपर’ ड्रोन्सच्या तुलनेत तुर्कीचे ‘बेरक्तार टीबी-२’ ड्रोन वजनाला हलके असून चार क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात. त्याचबरोबर अमेरिकी ड्रोन्सच्या तुलनेत स्वस्त आणि चिनी ड्रोन्सच्या तुलनेत भरवशाचे असल्यामुळे तुर्कीच्या ड्रोन्सची मागणी वाढत असल्याचा दावा केला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये लिबियातील गृहयुद्ध, आर्मेनिया-अझरबैजानतील संघर्ष आणि युक्रेन-रशियाच्या सीमेवरील तणावात तुर्कीने निर्मिती केलेल्या ड्रोन्सचा वापर झाला होता. काही आठवड्यांपूर्वीच तुर्कीच्या ‘बेरक्तार टीबी-२’ या ड्रोन्सद्वारे युक्रेनने रशियासमर्थक बंडखोरांच्या तळावर हल्ला केला होता. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता.
तर लिबियातील गृहयुद्धात तुर्कीच्या ड्रोन्सनी पूर्वेकडील भागात चढविलेल्या हल्ल्यांवर फ्रान्स तसेच अरब देशांमधून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तुर्कीचे ड्रोन्स नागरिकांवर हल्ले चढविण्यासाठी वापरले जात असल्याची टीका झाली होती. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी तुर्कीचे ड्रोन्स आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकत असल्याचे बजावले होते.