‘सोव्हिएत’ देशांना सदस्यत्व देण्यापासून नाटोने दूर रहावे

- रशियाचा आक्रमक पवित्रा

नाटोने दूर रहावेमॉस्को/वॉशिंग्टन – गेल्या शतकातील ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असलेल्या देशांना सदस्य बनविण्यापासून नाटोने दूर रहावे, अशी उघड व आक्रमक मागणी रशियाने केली आहे. त्याचवेळी पूर्व व मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घेणे आणि रशियन सीमेजवळील युद्धसराव थांबवणे यासारख्या मागण्यांचा समावेशही रशियन प्रस्तावात आहे. युरोपमधील तणाव कमी करण्यासाठी रशियाने पाश्‍चात्य देशांबरोबर ‘सिक्युरिटी पॅक्ट’ करण्याची तयारी दर्शविली असून त्यात या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाटो व अमेरिकेने या मागण्या फेटाळल्या असल्या तरी रशियाबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिले.

नाटोने दूर रहावेपाश्‍चात्या देशांना दिलेल्या प्रस्तावाचा मसुदा रशियाने शुक्रवारी जाहीर केला. यात रशियाने अमेरिका व नाटोच्या युरोपातील लष्करी हालचालींविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पाश्‍चात्य देश सातत्याने आपल्या मर्यादा ओलांडत आहेत. रशिया आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यास समर्थ आहे व वेळ आल्यास रशियाही नाटोप्रमाणे तर्क लावून मर्यादा ओलांडू शकतो. त्यासाठी रशिया सर्व मार्ग व साधनांचा वापर करु शकतो. नाटोच्या हालचाली अधिकाधिक चिथावणीखोर होत असून दोन्ही बाजूंना युद्धाच्या उंबरठ्यावर नेणार्‍या ठरल्या आहेत. रशियाला संघर्ष नाही तर योग्य करार हवा आहे. आक्रमक पावले उचलण्यापूर्वी समोरच्यांनी नकार दिला आहे, याची रशिया खात्री करुन घेईल’, अशा शब्दात शियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी बजावले.

नाटोने दूर रहावेरशियाने दिलेल्या प्रस्तावात, नाटोने युक्रेन व जॉर्जियासह एकेकाळी ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असणार्‍या कोणत्याही देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी नाटोने पूर्व तसेच मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घ्यावी व रशियन सीमेनजिकचे सराव थांबवावे, असेही म्हटले आहे. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांनी परस्परांच्या प्रभावक्षेत्रानजिक हल्ला चढविता येईल, अशी लढाऊ विमाने व युद्धनौका पाठविण्यावर बंदी घालावी, असेही रशियाने प्रस्तावात नमूद केले आहे.

रशियाच्या या मागण्यांना अमेरिका व नाटोने स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नाटोचे सदस्यत्त्व देण्याच्या मुद्यावर इतर कोणताही देश हस्तक्षेप करणार नाही, या भूमिकेचा नाटो प्रमुखांनी पुनरुच्चार केला. तर अमेरिकेच्या प्रवक्त्या जेन साकि यांनीही रशियाची मागणी फेटाळली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी, रशियाशी चर्चा करण्याची अमेरिकेची तयारी आहे असे म्हटले आहे.

leave a reply