तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवरील कुंपण उखडून टाकले

- पाकिस्तानच्या लष्कराला तालिबानची धमकी

काबुल – अफगाणिस्तान-पाकिस्तानची सीमा निश्‍चित करणारी ड्युरंड लाईन आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे तालिबानने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लक्षात आणून दिले. पाकिस्तानच्या लष्कराने या ड्युरंड लाईनवर उभारलेल्या काटेरी तारा तालिबानने उखडून टाकल्या आहेत. यापुढे अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलाच तर गोळ्या घालू, अशी धमकीच तालिबानने पाकिस्तानी लष्कराला दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानसाठी वकिली करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारसाठी ही जबरदस्त चपराक ठरली आहे.

तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवरील कुंपण उखडून टाकले - पाकिस्तानच्या लष्कराला तालिबानची धमकीअफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात जवळपास २,६७० किलोमीटर इतकी सीमा आहे. १८९३ साली ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड सीमा अफगाणिस्तानला अजिबात मान्य नाही. ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून यामुळे अफगाणिस्तानचा बहुतांश भाग पाकिस्तानमध्ये गेल्याचा दावा अफगाणिस्तानातील सरकारने वेळोवेळी केला आहे. पाकिस्तानच्या बलोचिस्तानपासून ते खैबर-पख्तूनख्वापर्यंतचा बराचसा भूभाग हा आपला असल्याचा दावा अफगाणिस्तान करीत आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई व अश्रफ गनी यांनी उघडपणे ड्युरंड सीमा मान्य नसल्याचे जाहीर केले होते. तसेच पाकिस्तानच्या लष्कराने ड्युरंड सीमेवर कुठल्याही प्रकारचे कुंपण किंवा तारा उभारू नये, असेही बजावले होते. गनी सरकारच्या काळात अफगाणी लष्कराने ड्युरंड सीमेवर बांधकाम करणार्‍या पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढविले होते. पाकिस्तानचे लष्कर आमच्या हद्दीत घुसून बांधकाम करून भूभागाचा ताबा घेत असल्याचा आरोप अफगाण सरकारने त्यावेळी केला होता.

ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणार्‍या तालिबानने देखील आपल्याला ड्युरंड लाईन मान्य नसल्याचे जाहीर केले. सीमेजवळ तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्कराला तालिबानच्या स्थानिक कमांडर्सनी याआधीही ड्युरंड सीमा मान्य नसल्याचे धमकावले होते. पाकिस्तानच्या अटकपर्यंत अफगाणिस्तानचा भूभाग असून लवकरच हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र केला जाईल, अशी घोषणा तालिबानच्या वरिष्ठ कमांडर्सनी केली होती.

तालिबानने पाकिस्तानच्या सीमेवरील कुंपण उखडून टाकले - पाकिस्तानच्या लष्कराला तालिबानची धमकीतर अफगाणिस्तानच्या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, दोन दिवसांपूर्वी नांगरहार प्रांतात पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या गुश्ता जिल्ह्यात पाकिस्तानी जवानांनी उभारलेल्या काटेरी ताराच तालिबानने उखडून टाकल्या. ड्युरंड सीमा आपल्याला मान्य नसून हे तारांचे कुंपणही खपवून घेणार नसल्याचे तालिबानने बजावल्याचे या बातमीत म्हटले आहे. यानंतर तालिबानचे कमांडर पाकिस्तानी जवानांसमोर काटेरी तारा मोटारीत टाकून निघून गेले.

त्याआधी तालिबानच्या कमांडरने पाकिस्तानी जवानाला धमकावल्याचाही दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलाच तर गोळ्या घालण्याची धमकी तालिबानने दिली. दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमेत ड्रोन हल्ला चढविला होता. त्यानंतरही तालिबानने पाकिस्तानला धमकावल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानची वकिली करणारा पाकिस्तान दुसरीकडे अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले चढवित आहे. तालिबानमधील काही गटांना पाकिस्तानची ही दुटप्पी भूमिका अजिबात मान्य नाही. येत्या काळात पाकिस्तानला याची जबर किंमत मोजावी लागेल आणि त्यावेळी जगाची सहानुभूती देखील पाकिस्तानला मिळणार नाही, अशी चिंता या देशाचे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

leave a reply