लाहोर – ‘भारतीय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख कळसूत्री बाहुले असा करतात. तर इम्रान खान पंतप्रधान असले तरी त्यांना एखाद्या शहराच्या महापौराइतकेच अधिकार आहेत, असे अमेरिकेत बोलले जाते. कारण इम्रान खान जनतेच्या मतांनी पंतप्रधानपदावर आलेले नाहीत. तर लष्कराने त्यांना या पदावर बसविलेले आहे, हे सार्या जगाला ठाऊक आहे’, अशा शब्दात माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर तोफ डागली. लंडनमधून मायदेशी परतण्याच्या तयारीत असलेल्या शरीफ यांनी केलेली ही टीका इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाचा काळ सरत आल्याचे संकेत देत आहे.
नवाझ शरीफ लवकरच पाकिस्तानात परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण त्यांना पाकिस्तानात त्वरित अटक करण्यात येईल, असा इशारा इम्रान खान यांच्या सरकारने दिला आहे. याच कारणामुळे आत्तापर्यंत नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात परतण्याचे टाळले होते. पण आता पाकिस्तानचे लष्कर आणि या देशाची जनता देखील इम्रान खान यांच्या विरोधात गेलेली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या सरकारने तुरुंगात टाकले, तरी त्याची पर्वा करण्याची गरज माजी पंतप्रधान असलेल्या नवाझ शरीफ यांना राहिलेली नाही. यामुळेच नवाझ शरीफ यांनी इम्रान खान यांच्याबरोबरच त्यांना अवैधरित्या सत्तेवर आणणार्या पाकिस्तानच्या लष्करावरही सडकून टीका केली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मी कधीही कर्ज घेणार नाही, त्यापेक्षा आत्महत्येचा मार्ग पत्करेन, असे विरोधी पक्षनेते असताना इम्रान खान म्हणाले होते. पण आता नाणेनिधीकडून कर्ज घेतल्यानंतर इम्रान खान कधी आत्महत्या करीत आहेत, याची आम्ही प्रतिक्षा करीत आहोत, असा टोला शरीफ यांनी लगावला. ‘गेल्या तीन वर्षाच्या काळात इम्रान खान यांच्या सरकारने नवे पाकिस्तान उभारण्याच्या नावाखाली ३४ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. आपल्या चुकीच्या धोरणांनी त्यांनी पाकिस्तानची पुरती दैना उडविलेली आहे’, असा घणाघात शरीफ यांनी केला.
दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर इम्रान खान यांचे दिवस भरल्याचे दावे पाकिस्तानात केले जात होते. लष्कराच्या इशार्यावर पाकिस्तानच्या माध्यमांनी इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. तसेच विरोधी पक्षनेत्यांचा आत्मविश्वासही यामुळे दुणावला होता. इम्रान खान यांची आर्थिक व परराष्ट्र धोरणे पूर्णपणे फसली असून यामुळे पाकिस्तान अधिकच गाळात रूतल्याचे आरोप तीव्र होत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि असुरक्षितता यांनी ग्रासलेली जनता इम्रान खान यांच्या नया पाकिस्तानपेक्षा आधी होता तसा पाकिस्तान बरा होता, असे सांगू लागली आहे. अर्थातच माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्याचा लाभ मिळत आहे.
मात्र इम्रान खान यांच्या जागी दुसरा कुणी पंतप्रधानपदावर आला तरी त्या नेत्याला पाकिस्तानच्या लष्कराबरोबर हातमिळवणी करावीच लागेल, असे या देशातील जबाबदार विश्लेषकांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांची अपरिपक्वता व बेताल धोरणे यामुळे वैतागलेले पाकिस्तानचे लष्कर आता दुसर्या नेत्याला पंतप्रधानपदावर बसविल. हा नवा पंतप्रधान नवाझ शरीफ असू शकतील किंवा पाकिस्तान पिपल्स पाटीचे नेते बिलावल भुत्तो असू शकतील. पण काही झाल्यास पाकिस्तानच्या लष्कराला मान्य नसललेला नेता या देशाच्या पंतप्रधानपदावर येऊ शकत नाही हे वास्तव आहे, असा निष्कर्ष पाकिस्तानच्या काही जबाबदार पत्रकारांनी नोंदविलेला आहे.