वॉशिंग्टन – यापुढील काळातील संघर्ष ‘हायब्रिड वॉरफेअर`चा वापर करून प्रभावीरित्या हाताळता येतील आणि त्यासाठी छोट्या, चपळ व स्थानिक वातावरणाशी चटकन जुळवून घेणाऱ्या युनिट्सची तैनाती महत्त्वाची ठरेल, असे ‘ब्लॅकवॉटर` कंपनीचे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी म्हटले आहे. ‘हायब्रिड वॉरफेअर`चा वापर असणारे हे संघर्ष पारंपारिक संरक्षणदलांऐवजी गुप्तचर यंत्रणा, स्पेशल युनिट्स व खाजगी लष्करी कंत्राटदार अधिक चांगल्या रितीने लढू शकतात, असा दावाही प्रिन्स यांनी केला.
‘एशिया टाईम्स` या हाँगकाँगस्थित ‘ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म`ला दिलेल्या मुलाखतीत प्रिन्स यांनी, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने व्हिएतनाम, सोमालिया, अफगाणिस्तान यासारख्या युद्धांमध्ये वापरलेल्या पारंपारिक धोरणांवर टीकास्त्र सोडले. खाजगी लष्करी कंत्राटदार व स्पेशल युनिट्स ही नवी संकल्पना नसून इतिहासात विविध रुपांमध्ये त्याचा वापर झालेला आहे, असा दावा प्रिन्स यांनी केला. दुसरे महायुद्ध व त्यानंतरच्या काळात अमेरिकेकडून अशा घटकांचा वापर कमी झाला व त्याचे परिणाम अमेरिकेला सहन करावे लागले, असे ‘ब्लॅकवॉटर`च्या प्रमुखांनी म्हटले आहे.
अमेरिकेने यापूर्वी 1970 व 1980च्या दशकात प्रभावीरित्या ‘प्रॉक्सी` संघर्षांचा वापर केला आहे. याची सूत्रे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडे होती, याकडे लक्ष वेधून अफगाणिस्तानमधील संघर्षदेखील ‘पेंटॅगॉन` अर्थात संरक्षण विभागाऐवजी ‘सीआयए`च्या ताब्यात द्यायला हवा होता, अशा शब्दात प्रिन्स यांनी अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीवर टीकास्त्र सोडले. सध्याच्या काळात अमेरिकेपेक्षा रशिया व चीन अधिक प्रभावीरित्या ‘हायब्रिड वॉरफेअर`चा वापर करीत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या माध्यमातून हे दोन्ही देश विविध भागांवर ताबा मिळविण्याबरोबरच तिथल्या साधनसंपत्तीची लूट करीत आहेत, याकडेही प्रिन्स यांनी लक्ष वेधले.
एरिक प्रिन्स यांची ‘ब्लॅकवॉटर` ही अमेरिकेतील आघाडीची खाजगी लष्करी कंत्राटदार कंपनी असून 1997 सालापासून कार्यरत आहे. या कंपनीने अमेरिकेसाठी अफगाणिस्तान, इराक, सिरिया, लिबिया अशा अनेक देशांमध्ये गोपनीय मोहिमा राबविल्या आहेत. इराक तसेच लिबियातील मोहिमांवरून या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू आहे.
2017 साली ‘ब्लॅकवॉटर`चे प्रमुख असलेल्या एरिक प्रिन्स यांनी अफगाणिस्तानमधील युद्ध खाजगी लष्करी कंत्राटदार कंपन्यांकडे सोपवावे, असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर 2019 साली व्हेनेझुएलातील हुकुमशहा निकोलस मदुरो यांची राजवट उलथविण्यासाठी ‘प्रायव्हेट आर्मी`चा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी अमेरिकेच्या सरकारला दिला होता.