ड्युरंड लाईनवरील तालिबानच्या आक्रमकतेने पाकिस्तानात खळबळ

ड्युरंडइस्लामाबाद/काबुल – पुन्हा एकदा तालिबानने ड्युरंड लाईनवरील कुंपण उखडून पाकिस्तानला अस्वस्थ करून सोडले. तालिबानची ही आक्रमकता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारी बाब असल्याचा इशारा या देशाचे विश्‍लेषक देत आहेत. पण पाकिस्तानचे सरकार व लष्कर मात्र ड्युरंड लाईनवरील या घडामोडींना विशेष महत्त्व नसल्याचे दावे करीत आहेत. यावर तालिबानच्या नेत्यांशी चर्चा झाली असून काही बदमाश हा वाद निर्माण करीत असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे..

ड्युरंडगेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्वप्रथम तालिबानचे अभिनंदन केले होते. तसेच तालिबानने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या असून तालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तान अमेरिकेच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्याची घोषणा पंतप्रधान इम्रान यांनी केली होती. उघडपणे तालिबानच्या हिंसचे समर्थन करणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या या घोषणेवर पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांनी टीका केली होती.

चार महिन्यानंतर तालिबानने ड्युरंड लाईनवर पाकिस्तानच्या लष्कराला धमकावण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या या आक्रमकतेमुळे पाकिस्तानचे सरकार अडचणीत सापडले असून पाकिस्तानी पत्रकार ड्युरंडपंतप्रधान इम्रान यांना त्यांच्याच विधानांची आठवण करून देत आहेत. तालिबानने पाकिस्तानी गुलामगिरीच्या बेड्याही तोडल्याचे दिसते आहे, असा टोला या पत्रकारांनी लगावला. त्याचबरोबर पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तानच्या समस्या अधिकच वाढल्याची चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांताच्या सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानचे लष्कर आमनेसामने आले होते. तालिबानने ट्रक चालवून पाकिस्तानच्या लष्कराने तारेच्या कुंपणासाठी उभारलेले खांब उखडून टाकले होते. हे सारे सुरू असताना पाकिस्तानचे जवान हतबल होऊन पाहण्याचे काम करीत होते. तर दुसऱ्या एका घटनेत काटेरी कुंपण उखडण्यासाठी आलेल्या तालिबानी कमांडर्ससमोर पाकिस्तानी लष्कराचा जवान विनवणी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता.

ड्युरंडयेथील कुंपण काढण्याआधी माझ्या वरिष्ठांशी बोलून घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्कराचा जवान करीत होता. पण तालिबानच्या कमांडरने पाकिस्तानी जवानाला दाद न देता कुंपण उखडण्याचे आदेश दिले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये अशा पाच घटना समोर आल्या आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ड्युरंड लाईनसंबंधीच्या बातम्यांवर चिंता व्यक्त केली. तसेच तालिबानच्या नेतृत्वाशी आपली चर्चा झाल्याचे कुरेशी म्हणाले. काहीजण पाकिस्तान आणि तालिबानमधील संबंध बिघडविण्यासाठी हे प्रकार करीत असल्याचे सांगून कुरेशी यांनी याप्रकरणी सारवासारव केली.

पण तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद आणि संरक्षण मंत्रालयाचा प्रवक्ता इनायतुल्ला ख्वारझमी यांनी ड्युरंड लाईनवरील कारवाईचे समर्थन करून पाकिस्तानच्या सरकारची हवा काढून घेतली. ड्युरंड लाईनचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नसून दोन्हीकडील पश्‍तू जनतेला विभागणारे तारेचे कुंपण अजिबात मान्य करणार नसल्याचे तालिबानच्या प्रवक्त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे येत्या काळातही तालिबान ड्युरंड लाईनवरील काटेरी कुंपण उखडून टाकत पाकिस्तानातील अटकपर्यंत अफगाणिस्तानच्या सीमा वाढवेल, अशी चिंता पाकिस्तानात व्यक्त केली जात आहे.

leave a reply