बैरूत – लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला याने सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझिझ अल सौद यांच्यावर गंभीर आरोप केले. राजे सलमान यांची राजवट इराक व सिरियामध्ये आत्मघाती हल्ले घडवित असल्याचा ठपका नसरल्लाने ठेवला. हिजबुल्लाह प्रमुखाच्या या आरोपांवर लेबेनॉनमधूनच प्रतिक्रिया आली. हसन नसरल्ला हा लेबेनीज सरकार व जनतेचे प्रतिनिधीत्व करीत नसल्याची टीका लेबेनॉनचे पंतप्रधान नजिब मिकाती यांनी म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी ठार झाले होते. त्यानिमित्ताने बैरूतमध्ये आयोजित कार्यक्रमाला व्हर्च्युअली संबोधित करताना हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्ला याने सौदी अरेबियाचे राजे सलमान व राजवटीवर गंभीर आरोप केले. राजे सलमान यांनी ‘आयएस`ची विचारधारा जगभरात पोहोचविल्याचा आरोप नसरल्लाने केला.
सौदीच्या हजारो जणांना राजे सलमान यांनी इराक आणि सिरियामध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी रवाना केल्याचा ठपका नसरल्लाने ठेवला. याबरोबरच येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरोधात लष्करी मोहीम छेडणाऱ्या सौदीवर नसरल्लाने जोरदार टीका केली. हिजबुल्लाहच्या प्रमुखाने सौदीच्या राजांवर केलेल्या या आरोपांवर सौदी व मित्रदेशांकडून प्रतिक्रिया उमटण्याच्या आधीच लेबेनॉनच्या सरकारने नसरल्लाच्या विधानांपासून फारकत घेतली.
लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन आणि पंतप्रधान मिकाती यांनी त्वरीत प्रतिक्रिया देऊन नसरल्लाहच्या विचारांशी लेबेनॉनचे सरकार सहमत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सौदी अरेबियाबरोबरची मैत्री लेबेनीज जनतेसाठी महत्त्वाची असल्याचे लेबेनॉनच्या नेत्यांनी म्हटले आहे. तर नसरल्लाह व त्याचा पक्ष हिजबुल्लाह हे लेबेनॉन आणि सौदी अरेबियामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लेबेनॉनच्या काही नेत्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी इराणसह हिजबुल्लाहवर टीका केली होती. इराण तसेच इराणचे समर्थन असलेली हिजबुल्लाह आखातातील अस्थैर्याचे प्रमुख कारण असल्याचा आरोप राजे सलमान यांनी केला होता. त्याचबरोबर लेबेनीज जनतेने हिजबुल्लाहची हुकूमशाही उधळून लावावी, असेआवाहन राजे सलमान यांनी केले होते.
गेल्या दीड वर्षापासून लेबेनॉनच्या जनतेमध्ये हिजबुल्लाहविरोधातील संताप वाढत आहे. हिजबुल्लाहमुळे लेबेनॉनमध्ये अस्थैर्य वाढले असून आर्थिक संकट ओढावल्याचा आरोप लेबेनीज जनता करीत आहे. तर वर्षभरापूर्वी बैरूत बंदरात झालेल्या शक्तीशाली स्फोटासाठी हिजबुल्लाहने साठा केलेली अमोनियम नायट्रेट ही रसायने जबाबदार होती, असे समोर आले. त्यामुळे लेबेनीज जनतेमधील हिजबुल्लाहविरोधी आक्रोश तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत, सौदीच्या राजांनी लेबेनीज जनतेला आवाहन केल्यामुळे खवळलेल्या नसरल्लाने राजे सलमान यांच्यावरच आरोप केले.
दरम्यान, 1990च्या दशकात बोस्नियन युद्धात सहभागी झालेली हिजबुल्लाह ही आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. अमेरिका व इस्रायलविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हिजबुल्लाहला युरोपिय महासंघ, अरब लीगने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सदर संघटना इराणशी एकनिष्ठ असून गेल्या काही वर्षांपासून इराक तसेच सिरियातील संघर्षात सहभागी आहे. सिरियातील हिजबुल्लाहच्या कारवाया आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता.