वॉशिंग्टन – कझाकस्तानमध्ये भडकलेली सरकारविरोधी निदर्शने व त्यानंतर लागू झालेल्या आणीबाणीचे थेट पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर झाले. जगातील युरेनियमचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कझाकस्तानातील हिंसाचारामुळे युरेनियमच्या दरात जवळपास आठ टक्क्यांची वाढ झाली.
जगभरातील युरेनियमच्या एकूण उत्पादनापैकी 40 टक्क्यांहून अधिक पुरवठा एकट्या कझाकस्तानमधून केला जातो. कझाकस्तानच्या शु-सरीसू, सिरदर्या, उत्तर कझाकस्तान, इली, कॅस्पियन आणि बालखाश भागात युरेनियमचा मोठा साठा आहे.
आत्तापर्यंत राजधानी नूर सुल्तानपर्यंत मर्यादित असलेली निदर्शने रातोरात कझाकस्तानच्या इतर शहरांमध्येही पसरली आहेत. युरेनियमचा साठा असलेल्या भागांमध्येही सरकारविरोधी हिंसक निदर्शनांनी पेट घेतला आहे. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील युरेनियमच्या दरावर झाला आहे.