अमेरिका नैसर्गिक इंधनवायुचा सर्वात मोठा निर्यातदार देश

वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असणाऱ्या ‘एनर्जी क्रायसिस`च्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका नैसर्गिक इंधनवायुचा (एलएनजी) जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. यापूर्वी ‘एलएनजी` निर्यातीत आघाडीवर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया व कतारला अमेरिकेने मागे टाकले आहे. 2018 साली अमेरिकेने कच्च्या तेलाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश म्हणून स्थान मिळविले होते.

अमेरिका नैसर्गिक इंधनवायुचा सर्वात मोठा निर्यातदार देशडिसेंबर महिन्यात अमेरिकेने तब्बल 77 लाख टन एलएनजी निर्यात केल्याची माहिती देण्यात आली. युरोप तसेच चीनसह इतर आशियाई देशांमध्ये वाढलेली मागणी हे निर्यातीतील वाढीचे प्रमुख कारण ठरले आहे. गेले काही महिने युरोप व रशियामध्ये युक्रेनच्या मुद्यावरून तणावाचे वातावरण आहे. या कालावधीत रशियाने युरोपिय देशांमधील इंधनपुरवठा घटविल्याचे मानले जाते. याचा सर्वाधिक फायदा अमेरिकेला झाला असून युरोपिय देशांनी विक्रमी पातळीवर अमेरिकी ‘एलएनजी` आयात केल्याचे समोर आले आहे.

आशिया खंडात चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘एलएनजी`च्या निर्यातीला फटका बसला आहे. अमेरिका नैसर्गिक इंधनवायुचा सर्वात मोठा निर्यातदार देशत्याचवेळी चीनमधील वीजटंचाईवर मात करण्यासाठी चीनने रशियाबरोबरच अमेरिकेकडूनही इंधनाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. त्याचा लाभ अमेरिकी कंपन्यांना झाला असून चीनमधील एलएनजीची निर्यातही वाढली आहे.

अमेरिकेने 2016 साली पहिल्यांदा ‘एलएनजी` निर्यात केला होता. त्यानंतर अवघ्या पाच वर्षात अमेरिका जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. यामागे ‘शेल गॅस` तंत्रज्ञानाने घडविलेली क्रांती व इंधनवायू क्षेत्रात झालेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक ही मुख्य कारणे ठरली आहेत. एलएनजी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असल्याने नजिकच्या काळातही अमेरिका आघाडीचा निर्यातदार म्हणून असलेले स्थान टिकवून ठेवेल, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply