पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल, असे निवडणूक आयोगाने घोषित केले. कोरोनाचे संकट लक्षात घेता 15 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली आणि रोड शोज्‌‍वर बंदी असेल, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर केला जाईल.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणाया पाच राज्यांमध्ये मिळून 690 विधानसभा मतदारसंघ असून यात 18.34 कोटी मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 8.5 कोटी इतकी असल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 403 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे या राज्यात सातही टप्प्यांमध्ये मतदान होईल. त्यानंतर मोठे राज्य असलेल्या पंजाबमध्ये 117 विधानसभा मतदारसंघ असून उत्तरखंडमध्ये 70, मणिपूरमध्ये 60 आणि गोव्यात 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोरोनाच्या साथीमुळे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पर्याय दिलेला आहे.

कोरोनाच्या साथीचा धोका लक्षात घेऊन या सर्व राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत निवडणूक रॅली, रोड शोज्‌, पदयात्रा आणि वाहनांद्वारे केल्या जाणाऱ्या रॅलीज्‌‍वरही बंदी टाकण्यात आली आहे. यानंतरच्या काळात कोरोनाच्या साथीची तीव्रता लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर फार मोठ्या मर्यादा येणार आहेत. मात्र कोरोनाची साथ रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या नियमांचे पालन राजकीय पक्षांनी केले नाही, तर निवडणूक आयोग कारवाई करताना कचरणार नाही, असे आयोगाने बजावले आहे.

साथीचा धोका लक्षात घेऊन राजकीय पक्ष व उमेदवारांनी आपला प्रचार व्हर्च्युअल व डिजिटल माध्यमांद्वारे करावा, असे निवडणूक आयोगाने सुचविले आहे. तसेच पुढच्या काळात प्रचारासाठी रॅलीज्‌‍ची परवानगी मिळाली, तर याकरीता येणाऱ्या सर्वांना मास्क व सॅनेटायझर पुरविण्याची व्यवस्था राजकीय पक्षांनी करावी, अशी सूचना आयोगाने केली. 10 मार्च रोजी या पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. मात्र निकालानंतर विजयी मिरवणूक व त्याच्या जल्लोषावर मर्यादा असतील, याचीही जाणीव निवडणूक आयोगाने करून दिली.

मतदान केंद्रांवरही कोरोनाची साथ रोखण्यासाठी आवश्‍यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झालेल्या पाचही राज्यांमध्ये कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मतदारांची संख्या नऊ कोटीहून अधिक आहे. तर कोरोनाच्या लसीचा एक डोस मिळालेल्या मतदारांची संख्या 15 कोटीहून अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

leave a reply