पाकिस्तानी लष्कराच्या सात जवानांना अफगाण तालिबानने ताब्यात घेतले

लष्कराच्या सात जवानांनाकाबुल/इस्लामाबाद – ड्युरंड लाईनवर काटेरी कुंपण उभारण्यावर ठाम असलेल्या पाकिस्तानला तालिबानने मोठा धक्का दिला. ड्युरंड लाईन ओलांडून अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या सात जवानांना तालिबानने ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून तालिबानने ‘रेड लाईन` ओलांडल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ पुढच्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी तालिबानने पाकिस्तानी जवानांना ताब्यात घेऊन आपले इरादे उघड केल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

पूर्व अफगाणिस्तानच्या पाकतिका प्रांतातील गोमाल भागात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या सात जवानांना अफगाण तालिबान ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या जवानांनी ड्युरंड लाईन ओलांडल्याचा आरोप तालिबान करीत आहे. अफगाणिस्तानातील आघाडीच्या वृत्तसंस्थांनी तालिबानच्या या कारवाईची ही माहिती दिली. काही सोशल मीडियावर तालिबानच्या ताब्यातील पाकिस्तानी जवानांचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत.

पाकिस्तानच्या सरकारने या घडामोडीवर बोलण्याचे टाळले आहे. पण पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये तालिबानच्या या कारवाईवर चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तालिबानकडून केल्या जाणाऱ्या कारवाया तुलनेने कमी तीव्रतेच्या होत्या. पण आत्ता तालिबानने पाकिस्तानच्या जवानांचे अपहरण करून ‘रेड लाईन` अर्थात मर्यादा ओलांडल्याचा संताप पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत.

गेल्या तीन आठवड्यांमध्ये तालिबानने ड्युरंड लाईनवरील पाकिस्तानच्या कारवाईला आव्हान दिले आहे. ड्युरंड लाईनवर उभारलेले कुंपण उखाडण्यापासून, पाकिस्तानी लष्कराला धमकावण्याचे प्रकार तालिबानने केले आहेत. काही ठिकाणी तालिबानने पाकिस्तानी जवानांसमोरच कुंपणावर ट्रक चालविल्याचे व्हिडिओ समोर आले होते.

लष्कराच्या सात जवानांनापण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सदर प्रकार काही ‘नॉन स्टेट ॲक्टर्स` करीत असल्याचे सांगून तालिबानचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. ड्युरंड लाईनचा वाद सलोख्याने सोडविण्यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. येथील तणाव वाढवून शत्रूला संधी द्यायची नाही, असे कुरेशी म्हणाले होते. पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते बाबर इफ्तिखार यांनी देखील पाकिस्तानचे लष्कर आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण लावत असून ते पूर्ण करणारच, असे ठामपणे सांगितले होते.

मात्र तालिबानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब आणि प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद यांनी ड्युरंड लाईनवर कुठल्याही प्रकारचे कुंपण खपवून घेणार नसल्याचे जाहीर करून पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली होती. तर पाकिस्तानचे लष्कर ड्युरंड लाईनवर कसे कुंपण लावतात आणि गस्त घालतात, असे सांगून तालिबानच्या कमांडरने पाकिस्तानला आव्हान दिले होते.

तालिबानच्या या आक्रमकतेवर पाकिस्तानातील पत्रकारांनी चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानसाठी पाकिस्तानच आंतरराष्ट्रीय स्तरावर वकिली करीत आहे. त्यामुळे ड्युरंड लाईनप्रकरणी तालिबानची कारवाई पाकिस्तानची कोंडी करणारी ठरते, असे पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी लष्कराने तालिबानविरोधात कारवाई केलीच तर त्याचे थेट परिणाम पाकिस्तानातील कट्टरपंथियांकडून उमटू शकतात, याची जाणीव हे पत्रकार करून देत आहेत.

leave a reply