इस्रायलविरोधी संघर्ष यापुढेही सुरू राहील

- हमासचा इशारा

इस्रायलविरोधी संघर्षतेहरान – इस्रायलविरोधात संघर्ष करणे हा आमचा अधिकार असून यापुढेही हा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा हमास या दहशतवादी संघटनेने दिला. हमासने गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा इस्रायलवर हल्ल्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षाच्या मे महिन्यात झालेल्या 11 दिवसांच्या संघर्षात हमासने इस्रायलवर साडेचार हजार रॉकेट्स डागून आपली क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे हमासने इस्रायलला दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्य वाढले आहे.

गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने काही तासांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, इस्रायलवर हल्ले चढविण्याची धमकी दिली. इस्रायल पॅलेस्टिनी जनतेचा प्रचंड छळ करीत असल्याचा आरोप हमासने केला. यासाठी इस्रायलचे सरकार, लष्कर यांच्यावर पॅलेस्टिनी महिला व मुलांच्या हत्याकांडासाठी जबाबदार धरून गंभीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी हमासने केली. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रायलविरोधात सुरू असलेला संघर्ष यापुढेही सुरू राहील, असे सांगून हमासने इस्रायलवर हल्ल्यांचे सत्र सुरू करण्याचा इशारा दिला.

काही दिवसांपूर्वीच हमासने गाझापट्टीतून इस्रायलच्या किनारपट्टीजवळील शहरांवर रॉकेट हल्ला केला होता. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. हमासशी निगडित असलेली इमारत व काही तळ या हल्ल्यात नष्ट केल्याचे इस्रायलने जाहीर केले होते. पण इजिप्तने मध्यस्थी करून हमास व इस्रायलमधील हा संघर्ष भडकणार नाही, याची काळजी घेतली होती. यानंतरही हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. तर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी हमासला याच्या परिणामांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता.

हमास व फताह या स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी संघर्ष करणाऱ्या दोन प्रमुख संघटना आहेत. हमास जहाल तर फताह तुलनेने मवाळ संघटना मानली जाते. आंतरराष्ट्रीय समुदायाने वेस्ट बँकमधील फताह पक्षाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या सरकारला मान्यता दिलेली असून यालाच पॅलेस्टाईनचे अधिकृत सरकार मानले जाते. तर गाझापट्टीतील हमास अजूनही दहशतवादी संघटनाच मानली जाते. फताहचे नेते व मान्यताप्राप्त पॅलेस्टिनींचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या महमूद अब्बास यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेटही घेतली होती. यामुळे अस्वस्थ झालेल्या हमासने इस्रायलविरोधातील संघर्ष तीव्र करण्याचे इशारे दिल्याचे दिसते.

सशस्त्र कारवाईच्या जोरावर पॅलेस्टाईनचा भूभाग स्वतंत्र करायचा, इस्रायलचे अस्तित्व पुसून टाकायचे, ही हमासची भूमिका आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये हमासने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलबरोबर झालेल्या संघर्षात हमासने अकरा दिवसात इस्रायलवर साडेचार हजार क्षेपणास्त्र व रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. इराण, सिरिया, कतार या देशांबरोबर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह ही इराणसमर्थक दहशतवादी संघटना हमासची समर्थक आहेत.

गाझापट्टीतून हमास, लेबेनॉनमधून हिजबुल्लाह आणि सिरियाच्या सीमेजवळून इराणसंलग्न दहशतवादी गट एकाचवेळी इस्रायलवर हल्ले चढवू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी याआधी दिला होता. इराणने देखील इस्रायलला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत गेल्या चार दिवसांमध्ये हमास, हिजबुल्लाह व सिरियातील इराणसंलग्न गटांच्या हालचाली चिंता वाढविणाऱ्या असल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या सर्वच शत्रूंनी एकाच वेळी चहूबाजूंनी हल्ले चढविले तर त्याला तोंड देण्याची आपली तयारी आहे का? असा प्रश्‍न इस्रायलच्याच एका माजी लष्करी अधिकाऱ्याने विचारला होता.

leave a reply