नूर सुल्तान/मॉस्को – कझाकस्तानमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. या कारवाईत आतापर्यंत सुमारे 160हून अधिक जणांचा बळी गेला असून दोन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षादलांनी आतापर्यंत पाच हजार 800हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, कझाकस्तानमधील निदर्शनांच्या मुद्यावर सोमवारी ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन`ची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती रशियाने दिली आहे.
गेल्या आठवड्यात इंधनांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीवरून कझाकस्तानच्या दोन शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली होती. अवघ्या 24 तासांच्या अवधीत ही निदर्शने इतर मोठ्या शहरांमध्येही पसरली. कझाकस्तानमधील सर्वात मोठे शहर असलेल्या अल्माटीमध्ये निदर्शनांनी हिंसक रुप धारण केले. निदर्शकांनी लष्कर तसेच पोलीसदलाच्या पथकांवर हल्ले चढवून सरकारी इमारती व विमानतळांवर ताबा मिळविला.
कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी आक्रमक भूमिका घेत निदर्शकांवर गोळ्या चालविण्याचे आदेश दिले. सुरक्षादलांवर हल्ले व राष्ट्रीय संपत्तीची नासधूस करून अराजक माजविणारे निदर्शक नाहीत, तर ते दहशतवादी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. तसेच यामागे परदेशी हात असू शकतो, असा दावाही केला. निदर्शनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियाकडे सहाय्याची मागणी केली.
रशियाने माजी सोव्हिएत देशांची संघटना असलेल्या ‘सीएसटीओ`च्या नेतृत्त्वाखाली शांतीपथक पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रशिया तसेच आर्मेनियाच्या लष्करी तुकड्या कझाकस्तानात दाखल झाल्या आहेत. कझाकस्तानचे लष्करही अनेक भागांमध्ये तैनात करण्यात आले असून सामरिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जागांवर अतिरिक्त तैनाती करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. त्याचवेळी निदर्शकांविरोधात व्यापक कारवाई सुरू असून स्थिती जवळपास नियंत्रणात आल्याचे दावे करण्यात येत आहेत. सुरक्षादलांच्या कारवाईत आतापर्यंत 164 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सर्वाधिक 103 बळी अल्माटी शहरातील आहेत. 2,200 हून अधिक निदर्शक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. अंतर्गत सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीत, 1300 जवान व पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. सुरक्षादलांनी ताब्यात घेतलेल्या निदर्शकांची संख्या 5,800 वर गेली आहे. शनिवारी कझाकस्तानच्या सुरक्षादलांनी दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख करीम मासिमोव्ह व काही संशयितांना राष्ट्रदोहाच्या आरोपाखाली ताब्यातही घेतले आहे.
सोमवारी माजी सोव्हिएत देशांची संघटना असणाऱ्या ‘सीएसटीओ`च्या सिक्युरिटी कौन्सिलची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रशियासह पाच देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित असतील, असे सांगण्यात येते.