नवी दिल्ली/तेहरान – अफगाणिस्तानातील कडक हिवाळ्यामुळे येथील मानवतावादी संकट भयावह बनले आहे. अन्नासाठी अफगाणी नागरिक आपल्या मुला-मुलींची विक्री करीत असल्याच्या हादरवून टाकणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अफगाणी जनतेपर्यंत गहू आणि वैद्यकीय सहाय्य पुरविण्याची तयारी भारताने केली आहे. पण हे सहाय्य पुरविण्यासाठी पाकिस्तान तितकासा उत्सुक नाही. यामुळे अफगाणिस्तानमधील भारताची प्रतिमा उंचावेल, या चिंतेने पाकिस्तानला ग्रासले आहे. अशा परिस्थितीत, इराणने भारत पुरवित असलेले सहाय्य अफगाणींपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या बातम्या येत आहेत.
शनिवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर अब्दुल्लाहियान यांची फोनवरुन चर्चा झाली. यामध्ये कोरोनाचे संकट, इराणच्या छाबहार बंदराचा विकास, इराणच्या अणुकार्यक्रमाचा तिढा आणि अफगाणिस्तानातील आव्हानांबाबत सविस्तर चर्चा पार पडली. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना आवश्यक ठरते, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. त्याचबरोबर भारत अफगाणी जनतेसाठी पाठवित असलेला पन्नास हजार मेट्रिक टन गहू, वैद्यकीय सहाय्य, कोरोनाची लस, हे सहाय्य पोहोचविण्यासाठी इराण उत्सुक असल्याचे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भारताने इराणमार्गे अफगाणी जनतेसाठी दोन टप्प्यात मानवतावादी सहाय्य पुरविले होते. तर याआधी नोव्हेंबर महिन्यात डब्ल्यूएचओच्या अंतर्गत भारताने अफगाणी जनतेसाठी 1.6 टन वैद्यकीय सहाय्य पुरविले. याशिवाय भारताने पाकिस्तानमार्गे 50 हजार मेट्रिक टन गहू, वैद्यकीय सहाय्य आणि कोरोनाची लस पुरविण्याचे जाहीर केले होते. पण पाकिस्तानने यासाठी भारतासमोर शर्ती ठेवल्या आहेत. त्या मानण्यास भारताने नकार दिला. पण या प्रश्नावर अजूनही पाकिस्तानशी चर्चा सुरू असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. पण याबाबत अधिक माहिती आलेली नाही. शनिवारी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मोत्ताकी इराणच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर इराणने भारताचे सहाय्य अफगाणींपर्यंत पोहोचविण्याची तयारी दाखविल्याचे दिसत आहे.