ऑस्ट्रेलिया व अमेरिकेदरम्यान अडीच अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

अडीच अब्ज डॉलर्सचाकॅनबेरा/वॉशिंग्टन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवायांचा धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने आपली संरक्षणसज्जता भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेबरोबर तब्बल अडीच अब्ज डॉलर्सचा संरक्षणकरार करण्यात आला आहे. या करारानुसार, ऑस्ट्रेलिया अमेरिकेकडून रणगाड्यांसह सशस्त्र वाहने खरेदी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी सदर कराराची माहिती दिली.

गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाने चीनच्या वर्चस्ववादी कारवायांविरोधात सातत्याने आक्रमक आवाज उठविला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विरोधामुळे चीनची कम्युनिस्ट राजवट चांगलीच बिथरली असून व्यापारयुद्ध छेडण्याबरोबरच धमकावण्यांचे सत्रही सुरू केले आहे. चीनच्या या दडपशाहीला ऑस्ट्रेलिया जशास तसे प्रत्युत्तर देत असून संरक्षणक्षमता वाढविण्याचे प्रयत्नही त्याचाच भाग आहे.

काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अमेरिका व ब्रिटनबरोबर ‘ऑकस डील`ला मान्यता दिली होती. या कराराच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या मिळणार आहेत. त्यानंतर गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियाबरोबर संरक्षणकरार करून ‘के9` तोफांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी जपानबरोबरही संरक्षण सहकार्य करार करण्यात आला आहे.

अमेरिकेकडून रणगाडे व सशस्त्र वाहने खरेदी करण्याचा निर्णय हा ऑस्ट्रेलियाने गेल्या चार महिन्यात केलेला चौथा करार ठरला आहे. 2.5 अब्ज डॉलर्सच्या नव्या करारानुसार, ऑस्ट्रेलिया 75 ‘अब्राम्स` रणगाड्यांसह 50हून अधिक सशस्त्र वाहने व यंत्रणा खरेदी करणार आहे. सदर रणगाडे व यंत्रणा 2025 सालापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणदलांमध्ये तैनात होतील, असा दावा सूत्रांनी केला आहे.

leave a reply