अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नागरिकत्व नसलेल्यांना मतदानाचा अधिकार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या आघाडीच्या शहरांपैकी एक असणाऱ्या न्यूयॉर्कने नागरिकत्व नसलेल्यांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा संमत केला आहे. या कायद्यानुसार, न्यूयॉर्कमध्ये 30 दिवसांहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या ‘परमनंट रेसिडंट्स`सह निर्वासित तसेच कामाचा परवाना मिळविलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या व्यक्ती शहराच्या मेयरसह सिटी कौन्सिलच्या सदस्यांची निवड करणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरणार आहेत.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात नागरिकत्व नसलेल्यांना मतदानाचा अधिकारअमेरिकेत 2020 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे दावे समोर आले होते. योग्य ओळखपत्र नसणाऱ्या तसेच नोंदणी नसणाऱ्या हजारो मतदारांनी मतदान केल्याचे उघड झाले होते. अशा प्रकारे झालेल्या मतदानामुळे निवडणूक गमवावी लागल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्कसारख्या आघाडीच्या शहरात झालेला कायदा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

नव्या कायद्यानुसार, नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना सध्या फक्त स्थानिक निवडणुकांमध्येच मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील निवडणुकांमध्ये या मतदारांना मतदान करण्यात येणार नाही. मात्र यापूर्वी निवडणुकांमध्ये झालेले गैरप्रकार पाहता अशा मतदारांना राष्ट्रीय स्तरावरील मतदानासाठी पात्र ठरविण्याचे प्रयत्नही होऊ शकतात, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेचे नागरिकत्व नसलेल्या पण मतदानाचा अधिकार मिळालेल्या मतदारांची संख्या आठ लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्क शहरात निर्वासितांसह नागरिक नसलेल्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येत असतानाच फ्लोरिडा, ॲरिझोना, अलाबामा यासारख्या राज्यांनी मात्र नागरिकत्व नसलेल्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये, अशा स्वरुपाच्या तरतुदींना मान्यता दिल्याचे समोर आले आहे.

leave a reply