नूर सुल्तान/वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात कझाकस्तानात पेटलेल्या दंगलींमागे अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यांचा वापर करुन कझाकस्तानात नियंत्रित अराजक निर्माण करायचे आणि सत्तेचा ताबा घेण्याची योजना आखण्यात आली होती, असा आरोप कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी केला. तर अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार आणि कझाकस्तानातील दंगली यांच्यात समान सूत्र असल्याचा लक्षवेधी दावा अमेरिकेतील रशियाचे राजदूत ॲनातोली अँतोनोव्ह यांनी केला.
गेल्या आठवड्यातील दंगलीनंतर कझाकस्तानमधील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. येथील इंटरनेट सेवा सुरू झाली असून लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल, असा दावा कझाकस्तानचे सरकार करीत आहे. सुमारे 164 जणांचा बळी घेणाऱ्या या दंगलीत सहभागी असलेल्या किंवा दंगलखोरांना सहाय्य करणाऱ्या 9,900 जणांना आत्तापर्यंत अटक झाली आहे. कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी नव्या सरकारची घोषणा केली असून अलीखान स्मायलोव यांना पंतप्रधान घोषित केले आहे.
कझाकस्तानशी व्यापारी सहकार्य असलेल्या युरोपिय महासंघाच्या काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्याशी व्हर्च्युअल चर्चा केली. या चर्चेत कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या आठवड्यात घडविण्यात आलेल्या नियोजनबद्ध दंगलीमागे प्रशिक्षित दहशतवादी असल्याचा आरोप केला. अफगाणिस्तानात तसेच आखाती व मध्य आशियातील दहशतवाद्यांनी कझाकस्तानच्या जनतेला लक्ष्य करून हिंसाचार घडविल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी ठेवला.
यासाठी कझाकस्तानला दहशतवादविरोधी मोहीम छेडावी लागल्याचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव म्हणाले. ही कारवाई पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुढच्या दोन दिवसात रशिया तसेच माजी सोव्हिएत मित्रदेशांचे लष्कर माघारी जातील, अशी माहिती कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. रशियाने देखील लवकरच ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएटीओ` अंतर्गत कझाकस्तानात तैनात केलेले आपलेलष्कर मायदेशी परतेल, असे सांगितले.
अमेरिकेतील रशियाचे राजदूत ॲनातोली अँतोनोव्ह यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार कझाकस्तानातील दंगलीशी जोडलेली असल्याचा दावा केला. ‘गेल्या आठवड्यात हजारो दहशतवादी आणि लुटारुंनी कझाकस्तानच्या घटनात्मक व्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले. अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढलेला पळ आणि त्यानंतर या क्षेत्रातील कट्टरवादात झालेली वाढच कझाकस्तानात हे सारे घडवित आहे`, असा आरोप राजदूत अँतोनोव्ह यांनी केला.
दरम्यान, बायडेन प्रशासनाने घेतलेल्या बेजबाबदार माघारीमुळे अफगाणिस्तानात दहशतवादी पुन्हा प्रबळ होतील, असा इशारा अमेरिकेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. यामुळे अफगाणिस्तानच्या शेजारी देशांबरोबर अमेरिकेच्या सुरक्षेलाही धोका असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बायडेन प्रशासनाला बजावले होते.