मॉस्को – रशियाला त्याच्या सुरक्षेबाबत असणार्या चिंतेच्या मुद्यावर अमेरिका व नाटोने दुर्लक्ष केल्याची टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत पुतिन यांनी ही भूमिका मांडली. त्याचवेळी रशियाला सध्या निर्माण झालेल्या तणावात अधिक भर टाकण्याची इच्छा नाही, असा दावाही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला आहे. रशियाने २०१४ साली युक्रेनवर आक्रमण करून क्रिमिआ हा प्रांत ताब्यात घेतला होता. त्याचवेळी पूर्व युक्रेनमधील काही भागावर रशिया समर्थक बंडखोरांनी ताबा मिळविला होता. त्यानंतर युक्रेनकडून नाटोच्या सदस्यत्त्वासाठी आक्रमक प्रयत्न सुरू असून या मुद्यावर रशियाने सातत्याने कडाडून विरोध केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गेल्या वर्षी युक्रेनचा नाटोतील समावेश ही रशियासाठी ‘रेड लाईन’ असेल, असे स्पष्ट शब्दात बजावले होते.
युक्रेन मुद्यावरील तणाव कमी करण्यासाठी पुतिन यांनी अमेरिका व नाटोला ‘सिक्युरिटी पॅक्ट’चाही प्रस्ताव दिला होता. रशियाने दिलेल्या प्रस्तावात, नाटोने युक्रेन व जॉर्जियासह एकेकाळी ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असणार्या कोणत्याही देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी नाटोने पूर्व तसेच मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घ्यावी व रशियन सीमेनजिकचे सराव थांबवावे, असेही म्हटले होते. मात्र अमेरिका तसेच नाटोने दिलेल्या लेखी उत्तरात या मागण्या फेटाळण्यात आल्या आहेत. यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली असून तीव्र नाराजी व्यक्त केली.
आपली नाराजी व्यक्त करतानाच, रशिया अमेरिका व नाटोच्या उत्तरांचा अभ्यास करीत असून चर्चेसाठी अजूनही तयार आहे, असा दावाही पुतिन यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत केला. रशियाकडून तणावात अधिक भर टाकण्यात येणार नाही, असे आश्वासन पुतिन यांनी दिल्याचे फ्रान्सकडून सांगण्यात आले. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही रशियाशी चर्चेची भूमिका घेतली होती. त्यामुळे मॅक्रॉन व पुतिन यांच्यात झालेली चर्चा महत्त्वाची मानली जाते. मॅक्रॉन यांच्यापाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील पुतिन यांच्याशी बोलणी करतील, अशी माहिती ब्रिटनकडून देण्यात आली आहे.