सेमीकंडक्टर्सच्या टंचाईमुळे अमेरिका व चीनमध्ये युद्धाचा भडका उडेल

- अमेरिकी अभ्यासगटाचा इशारा

युद्धाचा भडकावॉशिंग्टन/बीजिंग – प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ‘ब्रेन’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या सेमीकंडक्टर्सच्या टंचाईमुळे अमेरिका व चीनमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला आहे. गेल्या शतकात अमेरिका तेलासाठी ज्याप्रमाणे आखाती देशांवर अवलंबून होता, त्याचप्रमाणे सध्या तो तैवानमध्ये निर्माण होणार्‍या सेमीकंडक्टर्सवर अवलंबून असल्याचे अभ्यासगटाने बजावले. तैवानचे या क्षेत्रातील वर्चस्व चीनच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येत असल्याने चीन लष्करी कारवाईबरोबरच आर्थिक युद्ध तसेच ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर’चा वापर करेल, असे भाकित अभ्यासगटाच्या अहवालात वर्तविण्यात आले आहे.

‘सेंटर फॉर ए न्यू अमेरिकन सिक्युरिटी’ या अभ्यासगटाने, ‘व्हेन द चिप्स आर डाऊन’ नावाचा अहवाल तयार केला आहे. त्यात अमेरिका व चीनमध्ये जागतिक प्रभावासाठी सत्तास्पर्धा सुरू असल्याचे सांगून तंत्रज्ञान हा त्यातील महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २१व्या शतकातील बहुतांश दैनंदिन व्यवहारांशी तंत्रज्ञान जोडले गेले असून या तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर हा मध्यवर्ती घटक ठरला आहे. सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनात सध्या तैवान आघाडीचा देश असून अमेरिकाही या देशात तयार होणार्‍या सेमीकंडक्टर्सवर अवलंबून असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.

युद्धाचा भडकाचीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी तैवानचे विलिनीकरण हा मुद्दा प्राधान्यक्रमाचा असून त्यासाठी चीन हरएक प्रकारे प्रयत्न करीत आहे. हे विलिनीकरण, तैवानचा सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रभाव व अमेरिकेचे अवलंबित्व या गोष्टी ध्यानात घेता भविष्यात अमेरिकेला ठोस पर्याय निवडणे भाग पडेल, असा दावा अभ्यासगटाने केला आहे. गेल्या वर्षी सेमीकंडक्टर्सच्या कमतरतेमुळे अमेरिकेतील वाहनक्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता. चीनच्या कारवाया व भविष्यातील संभाव्य योजनांचा विचार करता, तैवानमधील सेमीकंडक्टर्सचे उत्पादन अचानक बंद पडण्याचा वा खंडित होण्याचा धोका असल्याची जाणीव अहवालात करून देण्यात आली आहे.

तैवानमधील सेमीकंडक्टर्सवर ताबा मिळविण्यासाठी चीन लष्करी कारवाईबरोबरच अपारंपारिक युद्धाचाही वापर करू शकतो, याकडेही ‘सेंटर फॉर ए न्यू अमेरिकन सिक्युरिटी’ने लक्ष वेधले आहे. सेमीकंडक्टर्स म्हणजे २१ व्या शतकातील ‘न्यू ऑईल’ असून तैवानने आपल्या सुरक्षेसाठी युद्धाचा भडकातसेच आर्थिक प्रगतीसाठी त्याचा वापर केला आहे. मात्र आतापर्यंत तैवानसाठी ‘सिलिकॉन शिल्ड’ म्हणून काम करणारे सेमीकंडक्टर्स दुधारी तलवार ठरण्याची शक्यता वाढली असल्याचे अमेरिकी अभ्यासगटाने बजावले. अमेरिका व चीनमधील वाढती सामरिक स्पर्धा तैवानचे भूराजकीय महत्त्व वाढविणारी ठरल्याचेही अहवालात म्हटले आहे.

गेल्या दशकभरात ‘५जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्यांनी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी चीनने सेमीकंडक्टर क्षेत्राकडे लक्ष वळविले असून चिनी कंपन्यांकडून सेमीकंडक्टर्सची निर्मिती सुरू झाल्याचे समोर येत आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने घेतली असून या क्षेत्रात चीनचे वर्चस्व निर्माण झाल्यास ती अतिशय धोकादायक बाब ठरु शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विश्‍लेषक बजावित आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांनी यासंदर्भात इशारा देताना, चीनकडून तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या हालचाली पुढील दशकभरात जगातील भूराजकीय समीकरणे बदलणार्‍या ठरतील, असा इशाराही दिला होता.

leave a reply