जेरूसलेम – भारत आणि इस्रायलमध्ये गहिरी दोस्ती असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या राजनैतिक संबंधांना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून भारताच्या पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. त्यावर आभार प्रदर्शित करणारा व्हिडिओ इस्रायलच्या पंतप्रधानांनी प्रसिद्ध केला. यात भारत व इस्रायलमध्ये गहिरी दोस्ती असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलबरोबरील सहकार्यासाठी केलेल्या नेतृत्त्वासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. भारत व इस्रायल वेगवेगळ्या आकाराचे देश आहेत खरे. पण दोन्ही देशांमध्ये बर्याच गोष्टी एकसमान आहेत. वैभवशाली वारसा, पारंपरिक स्नेहभाव आणि अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञानविषयक कौशल्य, या भारत व इस्रायलमधील एकसमान बाबी ठरतात, असे पंतप्रधान बेनेट पुढे म्हणाले. दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या राजनैतिक सहकार्याला तीस वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना, दोन्ही देशांची भागीदारी अधिकच भक्कम बनली आहे. ही उभय देशांच्या भविष्यासाठी फार मोठ आशादायी बाब ठरते. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने फार मोठी उंची गाठू शकतात, असा विश्वास पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी व्यक्त केला.
या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येणार आहेत. त्यांच्या या भेटीमुळे भारत व इस्रायलचे संबंध अधिकच दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला जातो. आत्ताच्या काळात सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील बदलांचा वेध घेता, भारत व इस्रायलच्या सहकार्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यामुळे दोन्ही देश अनेक आघाड्यांवर एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. विशेषतः संरक्षणाच्या आघाडीवर भारताच्या इस्रायलबरोबरील सहकार्याचे सकारात्मक लाभ दोन्ही देशांना मिळत आहेत.
भारत व इस्रायलने बराक ८ क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. सध्या येमेनमधील हौथी बंडखोरांच्या निशाण्यावर असलेल्या युएईला ही क्षेपणास्त्रे हवी आहेत. यासाठी युएई इस्रायल व भारताशी चर्चा करीत असल्याचे दावे केले जातात. मात्र त्याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही.