वॉशिंग्टन – ‘पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकेतील आपला राजदूत म्हणून निवड केलेले मसूद खान दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार आहेत. त्यांच्या चिथावणीमुळे बुर्हान वाणीसारखे तरुण दहशतवादाकडे वळले होते. त्यामुळे बायडेन प्रशासनाने त्यांची नियुक्ती रोखून योग्यच निर्णय घेतला. पण ही बाब पुरेशी नाही. मसूद यांचा राजनैतिक दर्जा पूर्णपणे रद्द करावा व त्यांच्या नियुक्तीसाठी पाकिस्तान करीत असलेले सारे प्रयत्न हाणून पाडावे’, अशी मागणी अमेरिकेचे कॉंग्रेसमन स्कॉट पेरी यांनी केली आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे माजी राष्ट्रपती व पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी असलेल्या मसूद खान यांची अमेरिकेत राजदूत म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. याद्वारे जम्मू-काश्मीरचा प्रश्न अमेरिकेकडे उपस्थित करण्याची तजवीज पाकिस्तानच्या सरकारने केली होती. मात्र मसूद खान यांचे दहशतवाद्यांशी संबंध असून ते दहशतवाद्यांचे सच्चे सहानुभूतीदार आहेत, अशी घणाघाती टीका स्कॉट पेरी यांनी केली. म्हणूनच त्यांची नियुक्ती रोखण्याचा बायडेन प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह ठरतो, असे पेरी यांनी म्हटले आहे.
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुर्हान वाणी आइण त्याच्यासारख्या तरुणांना मसूद खान यांनी चिथावणी दिली व भारतविरोधी दहशतवादाकडे वळविले, असा गंभीर आरोप पेरी यांनी केला. २०१७ साली अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनच्या नेत्यांवर निर्बंधांची कारवाई केली होती. त्याला मसूद खान यांनी कडाडून विरोध केला होता, याचीही आठवण पेरी यांनी करून दिली. तसेच १९७० च्या दशकाच्या सुरूवातीला मोठा रक्तपात घडविणार्या ‘जमात-ए-इस्लामी’चे खंदे समर्थक अशीही मसूद खान यांची ओळख आहे, याकडे स्कॉट पेरी यांनी लक्ष वेधले. अशा दहशतवाद्याला अमेरिकेच्या हितसंबंधांविरोधात काम करण्याची संधीच मिळता कामा नये, असे पेरी यांनी बजावले आहे.
मसूद खान यांची नियुक्ती म्हणजे फार मोठी घोडचूक ठरेल व ही बाब भारताच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल, असा इशारा पेरी यांनी दिला. दरम्यान, बायडेन प्रशासनाने मसूद खान यांची नियुक्ती रोखून पाकिस्तानला धक्का दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर बायडेन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी अद्याप चर्चा केलेली नाही. ही खंत पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेकवार बोलून दाखविली आहे. म्हणूनच इम्रान खान यांनी चीन तसेच रशियाबरोबरील संबंध वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. यासाठी बीजिंग येथे होणार्या विंटर ऑलिंपिकदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान रशियन राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी धडपडत होते. पण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची ही द्विपक्षीय चर्चा ठरलेली नाही, असे रशियाने जाहीर करून पाकिस्तानला निराश केले होते. आता मसूद खान यांची नियुक्ती रोखून पाकिस्तानला अमेरिकेनेही धक्का दिला आहे.
दरम्यान, भारताने आपला प्रभाव वापरून मसूद खान यांची नियुक्ती रोखल्याचे आरोप पाकिस्तानात सुरू झाले आहेत. पाकिस्तानची माध्यमे तसेच अमेरिकेत वास्तव्य करणारे पाकिस्तानी यामागे भारत असल्याचा आरोप करीत आहेत.