लंडन – अंतराळक्षेत्रातील वाढत्या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने स्वतंत्र ‘डिफेन्स स्पेस स्ट्रॅटेजी`ची घोषणा केली आहे. या धोरणाअंतर्गत ब्रिटनच्या संरक्षण विभागाकडून अंतराळक्षेत्राच्या सुरक्षेसाठी दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. अंतराळक्षेत्रासाठी लेझर कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून ‘सॅटेलाईट सर्व्हिलन्स सिस्टिम`ही उभारण्यात येणार आहे. ब्रिटनचे ‘मिनिस्टर फॉर डिफेन्स प्रोक्युरमेंट` जेरेमी क्विन यांनी यासंदर्भात घोषणा केली.
गेल्या काही महिन्यात रशिया व चीनकडून अंतराळक्षेत्रात सुरू असणाऱ्या हालचालींना पाश्चात्य देशांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. ब्रिटनच्या संरक्षणदलांच्या अधिकाऱ्यांनीही रशिया व चीनच्या अंतराळातील कारवाया अंतराळक्षेत्रातील व्यवहारांसाठी धोकादायक ठरत असल्याचे बजावले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ब्रिटनने ‘स्पेस कमांड` कार्यरत झाल्याची घोषणा करताना भविष्यात ‘स्पेस वेपन्स` तैनात करून त्यांचा वापर करु शकतो, असे संकेतही दिले होते.
या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या संरक्षण विभागाने ‘डिफेन्स स्पेस स्ट्रॅटेजी`ची घोषणा करणे महत्त्वाचे ठरते. वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचा संरक्षण विभाग अंतराळसुरक्षेसाठी काय पावले उचलेले याचा आराखडा ‘डिफेन्स स्पेस स्ट्रॅटेजी`च्या माध्यमातून देण्यात आला आहे. संरक्षणविभागाच्या मोहिमांसाठी टेहळणी तसेच गोपनीय माहिती मिळविणाऱ्या उपग्रहांचे जाळे उभारण्यात येणार आहे. ‘इस्टारी प्रोग्राम` असे नाव असलेल्या या योजनेसाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक निधी राखून ठेवण्यात आला आहे.
त्याव्यतिरिक्त प्रगत ‘लेझर कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी`साठी सुमारे 10 कोटी डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी ब्रिटनने संरक्षणदलांना ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी` पुरविण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सची स्वतंत्र तरतूद केली असून ‘स्कायनेट प्रोग्राम` अंतर्गत यंत्रणा उभारण्यात येत आहे. अंतराळक्षेत्रातील स्पर्धकांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहण्यात ‘डिफेन्स स्पेस स्ट्रॅटेजी` व त्याअंतर्गत करण्यात येणारी गुंतवणूक मोलाची भूमिका बजावेल, अशी ग्वाही ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दिली.
चीनकडून उपग्रह भेदणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. यात उपग्रहांना थेट उडविणारी क्षेपणास्त्रे, लेझर वेपन्स, इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि थेट उपग्रहांना धडक देणारी यंत्रणा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तर रशियाने अंतराळात शस्त्रांसारखा वापर करता येईल, अशा प्रकारचे उपग्रह तैनात केले होते. गेल्याच वर्षी चीन व रशियाकडून महत्त्वाकांक्षी ‘मून बेस`चीही घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने स्वतंत्र ‘स्पेस कमांड`ची उभारणी केली असून नाटोनेही अंतराळक्षेत्र हे पाचवे ‘युद्धक्षेत्र`(डोमेन) असल्याचे जाहीर केले आहे.