वॉशिंग्टन – हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या शर्यतीत रशिया व चीनने अमेरिकेवर आघाडी घेतल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरिया देखील आपण हायपरसोनिक क्षेपणास्त्राने सज्ज असून अमेरिका आपल्या निशाण्यावर असल्याचे ओरडून सांगत आहे. या तुलनेत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना भेदणारी हवाई सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे नसल्याचा इशारा अमेरिकी विश्लेषकांनी याआधी दिला होता. पण ‘डस्ट वॉल’ ही यंत्रणा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना गारद करू शकेल, असा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगटाने केला आहे.
‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज्-सीएसआयएस’ या अमेरिकी अभ्यासगटाने तयार केलेल्या अहवालात, डस्ट वॉल हे हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी योग्य उत्तर ठरेल, असे म्हटले आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याविरोधात ‘डस्ट पार्टिकल्स’ अर्थात विशिष्ट प्रक्रिया करून तयार केलेले धुलीकणांचे ढग म्हणजे ‘एकविसाव्या शतकातील तोफ’, असा दावा टॉम कराको आणि मसावो दालग्रेन यांनी केला. सीएसआयएसच्या अहवालात त्यांनी ही बाब नमूद केली आहे. रेथॉन टेक्नॉलॉजी आणि लॉकहीड मार्टिन या अमेरिकेतील संरक्षण साहित्याच्या निर्मितीतील आघाडीच्या कंपन्या यावर काम करीत आहेत.
सध्या जगभरातील आघाडीच्या देशांकडे प्रगत आणि अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत. पण या हवाई सुरक्षा यंत्रणा फक्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भेदू शकतात, असे या अभ्यासगटाने लक्षात आणून दिले. ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने प्रवास करणार्या, आपली दिशा बदलू शकणार्या आणि रडार यंत्रणांनाही चकवू शकणार्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विरोधात अद्याप कुठलीही हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित झालेली नाही. अमेरिकेची ‘मिसाईल डिफेन्स एजन्सी‘ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याविरोधात मल्टीलेयर अर्थात बहुस्तरिय हवाई सुरक्षा यंत्रणेवर विचार करीत आहे. मात्र अशी यंत्रणा विकसित करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागेल, असे या अभ्यासगटाने म्हटले आहे.
त्यापेक्षा ‘डस्ट वॉल’चे तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरेल. कारण ही यंत्रणा शत्रूच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या दिशेने सोडल्यास ती क्षेपणास्त्रे निकामी करता येऊ शकतील. किंवा त्यांचा मार्ग बदलला जाऊ शकतो, असा दावा सीएसआयएसने आपल्या अहवालात केला आहे. हे धुलीकण मेटॅलिक किंवा पायरोटेक्निक असू शकतात, असेही या अभ्यासगटाने सुचविले आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या वेगामुळे ही यंत्रणा अधिक प्रभावी ठरेल, असे या अभ्यासगटाने आपल्या अहवालातील नोंदीत म्हटले आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ही गेमचेंजर म्हणून ओळखली जातात. या क्षेपणास्त्रांमुळे युद्धाचे पारडे फिरविले जाऊ शकते, असे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. रशियाकडे ऍवानगार्ड हायपरसोनिक क्षेपणास्त्रे असून लवकरच याची तैनाती करणार असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी काही आठवड्यांपूर्वी जाहीर केले होते. तर चीनने देखील हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे प्रोटोटाईप विकसित केल्याचे जाहीर केले आहे.
अशा परिस्थितीत शत्रूदेशांच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना उत्तरे देण्यासाठी डस्ट वॉल निर्णायक ठरेल, असा अमेरिकी अभ्यासगटाने केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. विशेषतः युक्रेनच्या प्रश्नावर रशियाचे अमेरिका-नाटोसोबत युद्ध पेट घेईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत असताना डस्ट वॉलबाबत समोर आलेली ही माहिती म्हणजे योगायोग ठरत नाही. तर तो रशियाला इशारा देण्याच्या अमेरिकेच्या डावपेचाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.