बुर्किना फासो – आफ्रिकेच्या साहेल क्षेत्राचा भाग असलेल्या बुर्किना फासोतील सोन्याच्या खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ६० जणांचा बळी गेला आहे. खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके व रसायनांमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. पोनी प्रांतातील गबोमब्लोरामध्ये झालेल्या या दुर्घटनेत १००हून अधिक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास गबोमब्लोरामध्ये असलेल्या सोन्याच्या खाणीत मोठा स्फोट झाला. त्यानंतर पुढील काही मिनटात खाणीच्या भागात एकामागोमाग एक अनेक स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. खाणीच्या भागात भयावह स्थिती निर्माण झाली असून मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनी ‘आरटीबी’ने दिली आहे.
स्फोट झालेली सोन्याची खाण अवैधरित्या चालविण्यात येणार्या सोन्याच्या खाणींपैकी एक होती, असा दावा करण्यात येत आहे. बुर्किना फासो हा देश आफ्रिकेतील आघाडीच्या सोने उत्पादक देशांपैकी एक आहे. २०१९ साली या देशातील सोन्याची उलाढाल दोन अब्ज डॉलर्सहून अधिक होती. वाढत्या निर्यातीमुळे देशात अनेक भागांमध्ये बेकायदा सोन्याच्या खाणी उभ्या रहात असल्याचे समोर आले आहे. काही भागांमध्ये दहशतवादी तसेच बंडखोर संघटनांकडून सोन्याच्या खाणी चालविण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. सोने बेकायदेशीररित्या शेजारी देशांमध्ये निर्यात करून त्याद्वारे दहशतवादी संघटना निधी उभारत असल्याचेही समोर आले आहे.
काही दहशतवादी संघटनांनी सोन्याच्या खाणी चालविणार्या कंपन्यांकडून खंडणी वसूल केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. खंडणी न देणार्या कंपन्यांच्या खाणींवर तसेच कर्मचार्यांवर दहशतवाद्यांकडून हल्लेही करण्यात आले आहेत.
दरम्यान, बुर्किना फासोत गेल्याच महिन्यात लष्कराने बंड करून लोकशाहीवादी राजवट उलथून लावली आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात अस्थैर्य असून अवैध उद्योगांना मोकळे रान मिळाले आहे. या उद्योगांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने स्फोटासारख्या घटना घडत असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.