रशिया-युक्रेन तणाव चिघळल्याने कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९९ डॉलर्सवर पोहोचले

- आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये घसरण

प्रति बॅरल ९९ डॉलर्समॉस्को/लंडन/न्यूयॉर्क – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी रात्री केलेल्या घोषणेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटले. कच्च्या तेलाच्या दरांनी प्रति बॅरलमागे ९९ डॉलर्सचा टप्पा ओलांडला. सप्टेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या दरांनी ९९ डॉलर्सची पातळी पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कच्च्या तेलाबरोबर जागतिक शेअरबाजारांमध्येही पडझड झाली असून अमेरिका, युरोप व आशियातील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली.

सोमवारी रात्री रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची प्रति बॅरल ९९ डॉलर्सघोषणा केली. त्यापाठोपाठ रशियाचे लष्करही या प्रांतांमध्ये तैनात करण्यात आले. रशियाची ही कारवाई म्हणजे युक्रेनवरील आक्रमणच असल्याचा दावा पाश्‍चात्यांनी केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून टोकाची प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

मंगळवारी लंडन तसेच अमेरिकेत झालेल्या व्यवहारांमध्ये कच्च्या तेलाच्या दरांनी चार टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. लंडनमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये ‘ब्रेंट क्रूड’ तेलाने पाच टक्क्यांहून अधिक उसळी घेऊन प्रति बॅरलमागे ९९.३४ डॉलर्सची नोंद झाली. अमेरिकेत ‘डब्ल्यूटीआय’ प्रकारातील तेलाचे दर साडेचार टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवित प्रति बॅरलमागे ९५ डॉलर्सपर्यंत पोहोचले.

पुतिन यांच्या घोषणेनंतर रशियन शेअरबाजार तब्बल सहा टक्क्यांनी घसरला. तर रशियाचे चलन असणार्‍या रुबलचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८१ रुबलपर्यंत पोहोचले. ही दोन वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. अमेरिका व युरोपमधील शेअरबाजार दीड ते दोन टक्क्यांनी घसरले असून रशियन कंपन्यांच्या समभागांना जबरदस्त फटका बसला आहे. आशियाई शेअरबाजारातही दोन ते तीन टक्क्यांनी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

leave a reply