इम्रान खान यांचा रशिया दौरा पाकिस्तानला भोवला

- पाकिस्तानच्या बँकेवर अमेरिकेने साडेपाच कोटी डॉलर्सचा दंड लगावला

रशिया दौराइस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान यांचा रशिया दौरा पाकिस्तानला साडेपाच कोटी डॉलर्सला पडला. रशिया युक्रेनवर हल्ला चढवित असताना, पंतप्रधान इम्रान खान रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबर मॉस्कोमध्ये चर्चा करीत होते. याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला होता. त्यांचा इशारा प्रत्यक्षात उतरला असून अमेरिकेच्या ‘द फेडरल रिझर्व्ह बोर्ड’ तसेच ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस’ने मिळून पाकिस्तानच्या बँकेला सुमारे साडेपाच कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला.

रशिया व युक्रेनमध्ये लष्करी संघर्ष भडकण्याची दाट शक्यता समोर असताना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःहून रशियाला भेट देण्याची तयारी केली होती. रशियाच्या दौर्‍यासाठी ही योग्य वेळ नाही, असे पाकिस्तानचे विश्‍लेषक व माध्यमे बजावत असताना देखील, इम्रान खान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन केलेला नाही. यावर असंतोष व्यक्त करण्यासाठी आपण रशियासोबत आहोत, हे दाखविण्याची केविलवाणी धडपड पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली होती.

रशियात त्यांचे धडपणे स्वागत झाले नाहीच. वर रशियन राष्ट्राध्यक्षांनीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीला विशेष किंमत दिली नाही. असे असूनही आपला हा दौरा यशस्वी ठरल्याचे दावे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ठोकले होते. पण लवकरच अमेरिकेकडून यावर प्रतिक्रिया येईल, असे पाकिस्तानचे पत्रकार व विश्‍लेषक छातीठोकपणे सांगत होते. त्यांचा अंदाज खरा ठरला. अमेरिकेच्या ‘द फेडरल रिझर्व्ह बोर्ड’ने निधीच्या अवैध हस्तांतरणाविरोधातील कायद्यांचा भंग केल्याचा आरोप करून पाकिस्तानच्या बँकेला दोन कोटी, चाळीस लाख डॉलर्सचा दंड ठोठावला. तर ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस’ने पाकिस्तानच्या बँकेला सुमारे साडेतीन कोटी डॉलर्सचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेची पाकिस्तानवरील ही कारवाई इथेच थांबणार नाही. लवकरच ‘फायनॅन्शिअल ऍक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ची बैठक होणार आहे. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये असलेला पाकिस्तान अमेरिकेच्या इशार्‍याने काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो, याकडे पाकिस्तानची माध्यमे लक्ष वेधत आहेत. हे सारे इम्रान खान यांच्या बेताल धोरणामुळे घडत असल्याची टीका माध्यमांनी केली आहे. कारण नसताना, नको त्या वेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियाचा दौरा केला. यातून पाकिस्तानच्या हाती काहीही लागलेले नाही, उलट मोठे नुकसान झाले आहे, याकडे माध्यमे लक्ष वेधत आहेत.

याचे फार मोठे राजकीय परिणाम इम्रान खान यांना भोगावे लागणार आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या मुद्यावर इम्रान खान यांची खिल्ली उडविली आहे. तर या अपरिपक्व नेत्याच्या धोरणांचे परिणाम पाकिस्तानच्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला आहे. काही झाले तरी रशिया पाकिस्तानला भारताइतके महत्त्व देणे शक्य नाही, हे पाकिस्तानने समजून घ्यायला हवे. त्याचवेळी आपण भारताशी बरोबरी करू शकत नाही, हे सत्यही पाकिस्तानन स्वीकारायला हवे. आपली क्षमता व प्रभाव लक्षात न घेता, अमेरिकेसारख्या देशाला आव्हाने देणारे निर्णय घेतले, तर पाकिस्तानची धडगत नाही, ही बाब निदान आत्ता तरी समजून घ्या, असे कळकळीचे आवाहन काही पत्रकारांनी केले आहे.

leave a reply